बंडखोरांनी पर्यायी सरकार म्हणून स्वत:ला पुढे केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2016 04:38 AM2016-04-27T04:38:27+5:302016-04-27T04:38:27+5:30
उत्तराखंडमधील हरीश रावत सरकार अल्पमतात आले आहे, असे काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनी भाजपाच्या आमदारांसोबत एका सुरात राज्यपालांना सांगितले होते
नैनीताल : उत्तराखंडमधील हरीश रावत सरकार अल्पमतात आले आहे, असे काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनी भाजपाच्या आमदारांसोबत एका सुरात राज्यपालांना सांगितले होते आणि स्वत:ला पर्यायी सरकार म्हणूनच सादर केले होते, असे उत्तराखंड उच्च न्यायालयासमक्ष सांगून काँग्रेसच्या मुख्य प्रतोदाने आपण अद्यापही काँग्रेस पक्षासोबतच असल्याचा या नऊ बंडखोरांचा दावा फेटाळून लावला आहे.
अॅड. अमित सिब्बल यांनी मंगळवारी न्या. यू. सी. ध्यानी यांच्यासमक्ष काँग्रेसच्या मुख्य प्रतोदांच्या वतीने युक्तिवाद केला. ‘नवे बहुमत’ दाखविण्यासाठी हे नऊ बंडखोर आमदार राज्यपालांपुढे हजर झाले होते,’ असे सिब्बल यांनी यावेळी न्यायालयाला सांगितले. पक्षांतरविरोधी कायद्याअंतर्गत विधानसभा अध्यक्ष गोविंदसिंग कुंजवाल यांच्याद्वारे अपात्र घोषित करण्यात आलेल्या या नऊ बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय सुनावणी करीत आहे.
सिब्बल म्हणाले, ‘१८ मार्च रोजी सकाळी पत्र दिले आणि त्यानंतर सर्व ३५ आमदारांनी राज्यपालांसमक्ष हजर राहून स्वत:ला पर्यायी सरकार म्हणून सादर केले. त्यांनी व्यक्तिगतरीत्या राज्यपालांसमक्ष हजर राहण्याची गरज नव्हती. या बंडखोर आमदारांना नवे बहुमत तयार करायचे नव्हते तर राज्यपालांकडे जाण्याची गरजच काय होती? विरोधी पक्षनेते अजय भट्ट यांच्या लेटरहेडवर राज्यपालांना एक निवेदन सादर करण्यात आले होते, ज्यावर सर्व ३५ आमदारांच्या सह्णा होत्या. यावरून नऊ काँग्रेस बंडखोर आमदार भाजपाच्या २६ आमदारांच्या सुरात सूर मिसळून काम करीत होते, हे स्पष्ट होते.’ (वृत्तसंस्था)