जामिनावरील आरोपींनी पुन्हा केला बलात्कार
By admin | Published: July 19, 2016 05:55 AM2016-07-19T05:55:58+5:302016-07-19T05:55:58+5:30
एका दलित तरुणीवर जामिनावर सुटलेल्या आरोपींनी पुन्हा बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले
रोहतक : दिल्लीपासून जवळच असलेल्या रोहतकमधील महाविद्यालयात शिकणाऱ्या एका दलित तरुणीवर जामिनावर सुटलेल्या आरोपींनी पुन्हा बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले असून, त्यामुळे तिथे प्रचंड संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणातील पाचही आरोपी फरार असून, त्यांना अटक करण्याचा पोलीस प्रयत्न करीत नसल्याची तरुणीच्या कुटुंबीयांची तक्रार आहे.
याच तरुणीवर या पाचही आरोपींनी तीन वर्षांपूर्वी बलात्कार केला होता. त्या प्रकरणात दोन आरोपींना अटकही करण्यात आली होती. त्यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर ते दोघे आणि उरलेले तीन जणांनी मिळून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. ‘महाविद्यालयातून बाहेर पडत असताना आरोपींनी मला जबरदस्तीने उचलून कारमध्ये घातले आणि दूर ठिकाणी नेत त्या पाचही जणांनी बलात्कार केला,’ अशी तक्रार तिने पोलीस ठाण्यात केली आहे. ती युवती सध्या रुग्णालयात असून, ती अतिशय घाबरलेली आहे.
त्या तिघांना अटक झाली असती, दोघांना जामीन मिळाला नसता आणि न्यायालयाने पाचही जणांना शिक्षा सुनावली असती, तर हा प्रकार पुन्हा घडला नसता, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आरोपींपैकी तिघे उच्च जातीतील असून, त्यांच्याकडून धमक्या मिळाल्या, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या पाचही आरोपींना सारेच जण ओळखतात, पण घटनेला तीन दिवस उलटून गेले, तरीही पोलीस त्यांना अटक करीत नसल्याचा आरोप आॅल इंडिया शेड्युल कास्ट एम्प्लॉयीज फेडरेशनचे हरियाणा विभागाचे अध्यक्ष आर. के. रंगा यांनी केला. विविध संघटनांनी स्थानिक आमदार मनिष ग्रोव्हर यांच्याही निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. पोलीस उपअधीक्षक पुष्पा खतरी म्हणाल्या की, ‘आम्ही पाचही आरोपींचा शोध घेत आहोत. पुढील कारवाईसाठी आम्ही फोरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहोत.’ (वृत्तसंस्था)
>या तरुणांनी २0१३ साली तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर, आम्ही तुम्हाला पैसे देतो, पण तुम्ही हे प्रकरण मिटवून टाका, अशा धमक्या तिच्या घरच्या मंडळींना दिल्या जात होत्या, पण तिचे कुटुंबीय धमक्यांना बधले नाहीत. केवळ दोनच आरोपींना अटक झाली असून, उरलेल्या तिघांनाही ताबडतोब अटक करा, अशी मागणी कुटुंबीय सातत्याने करीत होते, पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, अशी त्यांची तक्रार आहे.