दीडपट भरपाई!
By admin | Published: April 9, 2015 04:37 AM2015-04-09T04:37:13+5:302015-04-09T04:37:13+5:30
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी निकष शिथिल करतानाच शेतक-यांना झालेल्या नुकसानीच्या दीडपट भरपाई देण्याची
नवी दिल्ली : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी निकष शिथिल करतानाच शेतक-यांना झालेल्या नुकसानीच्या दीडपट भरपाई देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. दुष्काळ आणि कर्जाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पीडित शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करीत भरपाईसाठी पूर्वीचा ५० टक्के नुकसानीचा निकष ३३ टक्क्यांवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही मोदी सरकारने घेतला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशाच्या उत्तर आणि मध्य भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीनंतर पंतप्रधानांनी हे निर्णय घेतले.
याबाबत अधिक माहिती देताना मोदी म्हणाले, की सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा निकष ५० टक्क्यांवरून ३३ टक्के करण्यात आला असून, यामुळे जास्तीत जास्त पीडित शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना आता नुकसानाच्या दीडपट मोबदला मिळेल. म्हणजे एक लाख रुपये मोबदला असेल तर दीड लाख रुपये मिळतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)