पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
By admin | Published: July 17, 2014 12:39 AM2014-07-17T00:39:50+5:302014-07-17T00:39:50+5:30
पाकिस्तानी रेंजर्सनी बुधवारी शस्त्रसंधीचे पुन्हा एकदा घोर उल्लंघन करीत जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या भारतीय सीमा चौक्यांवर तुफान गोळीबार केला
जम्मू : पाकिस्तानी रेंजर्सनी बुधवारी शस्त्रसंधीचे पुन्हा एकदा घोर उल्लंघन करीत जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या भारतीय सीमा चौक्यांवर तुफान गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाच्या १९२ बटालियनचा एक जवान शहीद झाला तर अन्य तीन जवान आणि तीन स्थानिक शेतमजूर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानी रेंजर्सनी आरएस पुराच्या अर्निया भागातील सीमा चौक्यांना लक्ष्य केले. सकाळी ७ वाजता सुरू झालेला हा गोळीबार ११ वाजेपर्यंत जारी होता. या सीमा चौक्यांचे रक्षण करणाऱ्या बीएसएफच्या जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यावेळी दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरू होता. जखमी जवानांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी कॉन्स्टेबल संजय धर या जवानाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला तेव्हा सीमेला लागून असलेल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना गोळ्या लागल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच सांबा जिल्ह्यातील चंबिलियाल येथे संयुक्त ध्वज बैठक घेतली होती. त्यानंतरही पाकने शस्त्रसंधी मोडली. जुलै महिन्यात पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडण्याची ही तिसरी वेळ आहे. (वृत्तसंस्था)