पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
By admin | Published: June 15, 2017 12:54 AM2017-06-15T00:54:23+5:302017-06-15T00:54:23+5:30
पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातील लष्करी चौक्या आणि वसाहतींना लक्ष्य करून बुधवारी शस्त्रसंधीचे दोन वेळा उल्लंघन केले.
जम्मू : पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातील लष्करी चौक्या आणि वसाहतींना लक्ष्य करून बुधवारी शस्त्रसंधीचे दोन वेळा उल्लंघन केले. या आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कराने अर्थातच कसर केली नाही. पाकने राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेलगत गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला.
गेल्या चार दिवसांत शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची ही नववी वेळ आहे. आज सीमेपलीकडून राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात अंदाधुंद मारा करण्यात आला, असे लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले. सीमेपलीकडून होत असलेला गोळीबार आणि तोफमाऱ्याला भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत असून, सध्या गोळीबार सुरू आहे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी पाकिस्तानी सैन्याने पहाटे पाच ते पावणेसहा वाजेदरम्यानही नियंत्रण रेषेलगतच्या भीमभेर गली सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. पाकने १२ जून रोजी तीन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. (वृत्तसंस्था)
पाक नागरिक जेरबंद
फिरोजपूर (पंजाब) : आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारताच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) अटक केली. मोहंमद इस्लाम (३२) असे त्याचे नाव असून, तो पाकिस्तानातील बाशीरवाला गावचा रहिवासी आहे. मोहंमद मद्यधुंद अवस्थेत आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय भूभागात घुसला होता.