सात वर्षांत तीन वेळा आठवण केली, तरीही काम होईना; अनेक मंत्रालयांवर पंतप्रधान मोदी नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 05:54 AM2022-10-11T05:54:40+5:302022-10-11T05:54:56+5:30
कॅबिनेट सचिवालय हे थेट पीएमओअंतर्गत आहे. या सचिवालयाने मंत्रालयांना पत्र पाठविले आहे.
- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आंतरमंत्रालयीन सल्लामसलत करण्यासाठी जेव्हा मसुद्याची प्रत पाठविली जाते तेव्हा कॅबिनेट सचिवालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्या काही मंत्रालये आणि विभागांवर पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही मंत्रालये आणि विभाग पंतप्रधान कार्यालय आणि कॅबिनेट सचिवालयाला मसुद्याची प्रत पाठवत नसल्याचे दिसून आले आहे, असे सचिवालयाने सर्व मंत्रालयांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
मंत्रालय आणि विभागांच्या सर्व सचिवांना पाठविलेल्या पत्राची प्रत ‘लोकमत’कडे आहे. कॅबिनेट सचिवालयातील अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी आशुतोष जिंदाल यांनी पत्र पाठवून सांगितले आहे की, गेल्या सात वर्षांत तीन वेळा याबाबत आठवण देण्यात आलेली आहे. मात्र, या सूचनांचे काही मंत्रालय आणि विभागांकडून पालन केले जात नाही. कॅबिनेट सचिवालय हे थेट पीएमओअंतर्गत आहे. ताज्या पत्रात म्हटले आहे की, विहित प्रक्रियेचे पालन केल्याने मसुद्याची काळजीपूर्वक तपासणी होऊ शकते आणि विसंगती सुधारण्यास मदत होते.
शहरी नक्षलींना नेस्तनाबूत करणार : मोदी
भरूच : शहरी नक्षली आपला वेश बदलून गुजरातमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हे राज्य त्यांना नेस्तनाबूत करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे म्हटले. भरूच जिल्ह्यात देशातील पहिल्या बल्क ड्रग पार्कच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आम आदमी पार्टीवरही जोरदार हल्ला चढवला. शहरी नक्षलवादी नव्या रूपात राज्यांत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आमच्या भोळ्याभाबड्या, उत्साही तरुणांची दिशाभूल करत आहेत, असे मोदी म्हणाले. यावर्षीच्या अखेरीस गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत.