तृतीयपंथीयाला मिळाली कष्टांची पावती !
By admin | Published: July 12, 2017 12:24 AM2017-07-12T00:24:05+5:302017-07-12T00:24:05+5:30
जोयिता मोंडल यांनी आपल्यासारख्याच इतरांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी केलेल्या कष्टांना राष्ट्रीय पातळीवर पावती मिळाली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) जोयिता मोंडल यांनी आपल्यासारख्याच इतरांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी केलेल्या कष्टांना राष्ट्रीय पातळीवर पावती मिळाली आहे. उत्तर दिनाजपूर, इस्लामपूर न्यायालयात जोयिता मोंडल शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ‘विद्वान न्यायाधीश’ म्हणून उपस्थित होत्या. तृतीयपंथी समाजाला भेदभावाची वागणूक मिळत असल्यामुळे त्यांच्या जीवनात आनंदोत्सव असा नाही.
जोयिता मोंडल यांना मिळालेली ही संधी त्यांच्यासाठी मोठी स्वागतार्ह घटना ठरली. मोंडल यांना त्यांच्या तृतीयपंथी असण्यामुळे जगण्यासाठी भीक मागावी लागली होती. २०१० मध्ये जोयिता यांना ते तृतीयपंथी असल्यामुळे हॉटेलमध्ये राहू दिले गेले नव्हते त्या अपमानापासून त्यांनी आपल्यासारख्याच असलेल्यांच्या कल्याणासाठी काम करायचे ठरवले. मग त्या सामाजिक कार्यकर्त्या झाल्या. त्या नात्याने राष्ट्रीय लोक अदालतवर त्यांच्या झालेल्या निवडीने जोयितांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली आणि परिस्थितीवर त्यांनी विजय मिळवला.
या नियुक्तीने आम्हाला आनंद झाला, असे ट्रान्स वेल्फेअर इक्विटी अँड एम्पॉवरमेंट ट्रस्टच्या संस्थापक अभिना आहेर यांनी सांगितले. तृतीयपंथी समाजातून लोक अदालतवर काम करण्याची संधी मिळालेल्या जोयिता या पहिल्याच आहेत. हे केवळ सक्षमीकरण नसून व्यवस्थेत सहभागी होऊन काही बदल घडवून आणण्यासाठी अधिकार प्राप्त करणे होय, असे अभिना आहेर म्हणाल्या.
हॉटेलने नाकारल्यावर जोयिता ज्या बसस्टँडवर झोपल्या होत्या. त्या ठिकाणाहून हे न्यायालय पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. जोयिता यांनी दिनाजपूर नूतन आलो सोसायटी स्थापन करून समाजासाठी केलेल्या कार्याची आठवण त्यांच्या मित्रपरिवाराला आहे. लोक अदालतच्या खंडपीठात जोयिता अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि वकिलासोबत बसल्या होत्या.
> पक्षपातींना संदेश
जोयिता मोंडल म्हणाल्या की, नियुक्तीमुळे मला खूप आनंद झाला आहे. हा मैलाचा दगड ठरला असून त्यामुळे तृतीयपंथी समाजाला पक्षपाती वागवणाऱ्यांना कडक संदेश दिला गेला आहे.