"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 07:10 PM2024-05-26T19:10:17+5:302024-05-26T19:11:50+5:30
आप खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री केजरीवालांच्या सहकाऱ्याने केलेल्या कथित मारहाणीमुळे प्रकरण वाढले आहे.
Swati Maliwal vs AAP :आप खासदार स्वाती मालीवाल आणि पक्षातील नेत्यांमध्ये सुरू झालेला वाद आता आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांनी केलेल्या कथित हल्ल्यानंतर आता पक्षातील लोकांकडून बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणावर व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या यु-ट्यूबर ध्रुव राठीलादेखील जबाबदार धरले आहे.
After the leaders and volunteers of my party i.e. AAP orchestrated a campaign of charachter assassination, victim shaming and fanning of emotions against me, I have been getting rape and death threats.
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) May 26, 2024
This got further exacerbated when YouTuber @Dhruv_Rathee posted a one-sided… pic.twitter.com/EfCHHWW0xu
'बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या आल्या'
रविवारी(दि.26) स्वाती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली की, "माझ्या पक्षाच्या(AAP) च्या नेते आणि कार्यकर्त्यांनी चारित्र्यहणन मोहीम सुरू केल्यानंतर आता मला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तक्रार मागे घेण्यासाठी मला धमकावले जात आहे. युट्यूबर ध्रुव राठीने माझ्या विरोधात एकतर्फी व्हिडिओ पोस्ट केल्यावर यात आणखी वाढ झाली आहे. माझी बाजू मांडण्यासाठी मी ध्रुव राठीला फोन केला, पण त्याने माझ्या कॉल्स आणि मेसेजकडे दुर्लक्ष केले. त्याच्यासारख्या स्वतंत्र पत्रकाराने 'आप'च्या इतर प्रवक्त्यांसारखे वागणे लज्जास्पद आहे."
ध्रुव राठीच्या व्हिडिओबाबत आपले मत मांडताना स्वाती मालीवाल यांनी काही मुद्दे मांडले.
1. घटना मान्य करुन पक्षाने यू-टर्न घेतला.
2. एमएलसी (मेडिको-लीगल केस) अहवालात हल्ल्यामुळे झालेल्या जखमा.
3. व्हिडिओचा एक भाग प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर आरोपीने फोन केला.
4. आरोपीला घटनास्थळावरून (CM House) अटक करण्यात आली. पुराव्याशी छेडछाड करण्यासाठी त्याला पुन्हा तिथे का जाऊ दिले?
5. जी महिला नेहमी योग्य मुद्द्यांसाठी उभी राहिली, अगदी सुरक्षेशिवाय एकटी मणिपूरला गेली, तिला भाजप कसे विकत घेईल?
मालीवाल पुढे म्हणाल्या, "आप आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा ज्या प्रकारे मला अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावरुन महिलांच्या प्रश्नांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट होते. मी दिल्ली पोलिसांकडे बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्यांची तक्रार करत आहे. ते गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील, अशी आशा आहे. मला काही झाले तर ते कोणाच्या प्रेरणेवर घडेल, हे आता आम्हाला माहीत आहे," अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
दरम्यान, स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणावरुन आप आणि भाजपमध्ये वाद सुरू आहेत. दुसरीकडे, कथित हल्ल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने बिभव कुमारला शुक्रवारी (24 मे) चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तो 28 मे पर्यंत कोठडीत राहणार आहे.