मंदीचा रेल्वेलाही जबरदस्त फटका; माहिती अधिकारामुळे नुकसानीचा आकडा उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 09:19 AM2019-10-27T09:19:37+5:302019-10-27T09:20:33+5:30
मध्य प्रदेशच्या नीमचचे रहिवासी चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागविली होती.
नवी दिल्ली : देशभरात आलेल्या मंदीच्या लाटेमुळे वाहन उद्योगांपासून अनेक उद्योगांनी गेल्या दोन महिन्यांत अनेकदा कंपन्या बंद ठेवल्या आहेत. तर अनेक कामगारांना कामावरून कमी केले आहे. या उत्पादन घटविल्याचा फटका रेल्वेलाही सोसावा लागला आहे.
यंदाच्या पहिल्या आर्थिक तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीमध्ये रेल्वेला प्रवासी भाड्यातून 155 कोटी रुपये आणि मालवाहतुकीतून तब्बल 3901 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. माहिती अधिकारात हा तोटा समोर आला असून याचे मुख्य कारण देशात मंदी असल्याने मालवाहतूक घटल्याचे समजते.
मध्य प्रदेशच्या नीमचचे रहिवासी चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागविली होती. यानुसार रेल्वेला पहिल्या तिमाहीमध्ये प्रवासी भाड्याचून 13,398.92 कोटींची कमाई झाली होती. तर दुसऱ्या तिमाहीमध्ये 13,243.81 कोटींची कमाई झाली. तर पहिल्या तिमाहीमध्ये मालभाडे 29,066.92 कोटींचे होते. हे भाडे घटून 25,165.13 कोटी रुपयांचे झाले आहे.
तिकिट विक्रीमध्येही घट
गेल्या वर्षीच्या तिकिट विक्रीशी तुलना करता यंदा यामध्ये 1.27 टक्क्यांची घट झाली आहे. तर उपनगरीय तिकिटांच्या विक्रीमध्ये 1.13 टक्क्यांची घट झाली आहे.
रेल्वे खात्याने मंदीमुळे झालेल्या नुकसानीवर मात करण्यासाठी काही पाऊले उचलली आहेत. नुकताच त्यांनी सिझनचा अधिभार बंद केला आहे. तर एसी आणि एक्झीक्युटिव्ह श्रेणीच्या तिकिटांवर 25 टक्क्यांची सूट दिली आहे. तसेच इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी 30 वर्षे जुनी इंजिने बंद करण्यात येणार आहेत. गेल्या महिन्यातच रेल्वेने 17 झोनच्या मुख्यालयांना पत्र लिहून मंदीला रोखण्याची सूचना केली आहे. तसेच कोळशाच्या खाणींच्या क्षेत्रात पूर आल्याने कोळसा वाहतूकही कमी झाली आहे. मंदीने इस्पात आणि सिमेंट उद्योगाचेही कंबरडे मोडले आहे. यामुळे या मालाचीही वाहतूक मंदावली आहे.