कोळसा हाताळणीला दणका, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 21 खाणींना 2 महिन्यांसाठी मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 08:25 PM2018-01-08T20:25:52+5:302018-01-08T20:26:01+5:30
राज्यातील मुरगाव बंदरात प्रदूषणाची पर्वा न करता होणा-या कोळसा हाताळणीला गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दणका दिला.
पणजी : राज्यातील मुरगाव बंदरात प्रदूषणाची पर्वा न करता होणा-या कोळसा हाताळणीला गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दणका दिला आहे. साऊथ वेस्ट पोर्ट लिमिटेड (एसडब्ल्यूपीएल) कंपनीला 1981 सालच्या जल आणि हवा प्रदूषण नियंत्रण कायद्याखाली मंडळाने दिलेले कन्सेन्ट टू ऑपरेट परवाने सोमवारी मागे घेतले. हे परवाने नसताना ही कंपनी कोळसा हाताळणी करू शकत नाही व त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाने कोळसा हाताळणी निलंबित करावी, असा आदेश मंडळाने दिला आहे. राज्यातील 21 खनिज खाणींना दोन महिन्यांसाठी मार्च 2018 पर्यंत मंडळाने कन्सेन्ट टू ऑपरेट देण्याचा निर्णय घेतला.
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची सोमवारी दिवसभर बैठक झाली. साऊथ वेस्ट पोर्ट लिमिटेड कंपनीच्या कोळसा हाताळणीचा विषय यापूर्वी खूप गाजला आहे. या कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. कंपनीने नोटिशीला उत्तर पाठवल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीला सोमवारी बोलावून घेऊन मंडळाने सुनावणी केली. सुनावणीनंतर मंडळाच्या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली आणि कन्सेन्ट टू ऑपरेट मागे घेण्याचा निर्णय झाला. कारण या कंपनीने ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात कोकिंग कोलची हाताळणी केली.
मंडळाच्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यास वेळ मिळावा म्हणून ही कंपनी यापूर्वी उच्च न्यायालयातही गेली होती. मंडळाने मग दोन आठवड्यांचा अतिरिक्त वेळ कंपनीला दिला होता. तसेच या कंपनीला व्यक्तिगत सुनावणी द्यावी असेही ठरवले होते. 30 नोव्हेंबर 2017 रोजी मंडळाने कंपनीला दिलेल्या नोटिशीला 28 डिसेंबर 2017 रोजी उत्तर आले.
5.987 एमएमटी अतिरिक्त हाताळणी
मंडळाने कंपनीला 4.125 वार्षिक एमएम टन कोळसा हाताळणी करण्यास जल व हवा कायद्यांतर्गत मान्यता दिली होती. मात्र कंपनीने 2016-17 या काळात 10.112 एमएम टन एवढी कोळसा हाताळणी केली, अशी नोंद मंडळाने मुरगाव बंदराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केली आहे. या कंपनीने कन्सेन्ट टू ऑपरेटच्या सूचनेचा भंग करत 5.987 एमएमटी अतिरिक्त कोळसा हाताळणी केली, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.