धोका ओळखा, पृथ्वी काही केल्या थंड होईना! २१ जुलै ठरला ८४ वर्षांतील जगातील सर्वांत उष्ण दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 07:29 AM2024-07-25T07:29:31+5:302024-07-25T07:29:55+5:30
गेल्या जूनपासून सलग १२ महिन्यांत जागतिक तापमान दर महिन्याला १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: २१ जुलैला जागतिक सरासरी तापमानाने १७.९ अंश सेल्सिअसची सर्वोच्च पातळी गाठली असून, हा दिवस ८४ वर्षांनंतर पृथ्वीवरील सर्वांत उष्ण दिवस ठरला आहे. युरोपियन युनियनच्या कॉपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिससने ही माहिती दिली आहे.
गेल्या जूनपासून सलग १२ महिन्यांत जागतिक तापमान दर महिन्याला १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होत आहे. गेल्या वर्षी जूनपासून प्रत्येक महिन्यात सर्वाधिक उष्णतेची नोंद होत आहे. २१ जुलै हा किमान १९४० नंतरचा सर्वांत उष्ण दिवस होता.
सलग ५७ दिवस...: जुलै २०२३ व मागील सर्व वर्षांच्या तापमानात मोठा फरक आहे. जुलै २०२३ पूर्वी पृथ्वीचे सरासरी तापमान १६.८ अंश सेल्सिअस होते. मात्र, ३ जुलै २०२३ पासून आतापर्यंत ५७ दिवस असे गेले आहेत की जेव्हा तापमानाने मागील विक्रमाची पातळी ओलांडली आहे.
२०२४ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष असेल की नाही हे मुख्यत्वे ला निनाच्या विकासावर आणि तीव्रतेवर अवलंबून आहे.
समुद्रातील बर्फ पृथ्वीला थंड करेना
मिशिगन विद्यापीठाशी संबंधित संशोधकांनी १९८० ते २०२३ दरम्यान उपग्रहांकडून मिळालेल्या डेटाचा अभ्यास केला आहे. यात वातावरणातील ढगांसह समुद्राच्या बर्फातून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाचे विश्लेषण करण्यात आले आहे. समुदातील बर्फाची पृथ्वीवरील वातावरण थंड ठेवण्याची क्षमता जवळजवळ दुप्पट कमी झाल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.
तापमान का वाढतेय? अंटार्क्टिकामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान असल्याचा परिणाम म्हणून सध्या जगात तापमानवाढ होत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.