कोईम्बतूर बॉम्बस्फोट प्रकरण एनआयएकडे सोपविण्याची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 11:34 AM2022-10-27T11:34:41+5:302022-10-27T11:34:56+5:30
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली सचिवालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणाच्या तपासाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.
चेन्नई: तामिळनाडू सरकार कोईम्बतूर बॉम्बस्फोट प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्याची शिफारस केंद्राकडे करणार आहे. राज्य सरकारने बुधवारी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली सचिवालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणाच्या तपासाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता लक्षात घेऊन तपास एनआयएकडे सोपवण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्टॅलिन यांच्या निर्देशांचा हवाला देत अधिकृत प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.
कोईम्बतूर येथे कारमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला. मृतांच्या घरातून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. या स्फोट प्रकरणाचे काही आंतरराष्ट्रीय कनेक्शन असावे अशी शक्यता गृहित धरून तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. या अनुषंगाने विविध पातळीवर संशयितांचा शोध घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.