शेतकऱ्यांना नव्याने कृषी कर्ज देण्याची शिफारस
By admin | Published: February 16, 2016 03:21 AM2016-02-16T03:21:49+5:302016-02-16T03:21:49+5:30
राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांतील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासह महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत
मुंबई : राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांतील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासह महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. हरीश तिवारी यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक शेती स्वावलंबन समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपविला आहे.
राज्यातील १४ दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना सांगताना या समितीने काही शिफारसी केल्या आहेत. यात प्रामुख्याने आपत्कालीन योजनेचा प्रस्ताव आहे. यात सामाजिक सुरक्षा, आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. तथापि, शेतकऱ्यांना १०० टक्के नवे कृषी कर्ज आणि पीक विमा सुरक्षा देण्याची शिफारस करण्यात आली आहे. दीर्घकालीन कृषी कर्ज देण्याबाबतही यात सुचविण्यात आले आहे.
शैक्षणिक सुविधांत सुधारणा करणे, निर्भर, तसेच भ्रष्टाचारमुक्त स्थानीय शासन व्यवस्था, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणे आदी शिफारशी करण्यात आल्या आहेत