सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 07:05 AM2024-05-30T07:05:08+5:302024-05-30T07:05:45+5:30
विदर्भ चाळिशीपार; नागपुरात उष्माघाताने ६ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बुधवारी दुपारी आजवरचे ऐतिहासिक ५२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पुढे आले, परंतु दिल्लीत एवढे तापमान अशक्य आहे. सेन्सरमधील त्रुटींमुळे विक्रमी तापमानाची नोंद झाली. दिल्लीतील सरासरी तापमान हे ४६.८ अंश सेल्सिअस इतकेच होते, असे स्पष्टीकरण भारतीय हवामान विभागाच्या वतीने देण्यात आले.
काही दिवसांपासून दिल्लीसह उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. मंगळवारी दिल्लीच्या मुंगेशपूरमध्ये ४९.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले. त्यानंतर अवघ्या २४ तासांत मुंगेशपूरमध्ये बुधवारी दुपारी अडीच वाजता ५२.९ अंश तापमानाची झाली. दिल्लीच्या पाऱ्याने राजस्थानलाही मागे टाकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त झाले. परंतु काही वेळाने हवामान विभागानेही शंका उपस्थित केली.
देशात हरयाणाच्या रोहतकमध्ये बुधवारी सर्वाधिक ४८.८ अंश तापमान असल्याचे हवामान विभागाच्यावतीने रात्री उशिरा स्पष्ट करण्यात आले. ताेपर्यंत दिल्लीच्या विक्रमी तापमानाचीच देशभरात गरमागरम चर्चा रंगली हाेती.
३ तासांची पगारी रजा
दिल्लीतील तापमानवाढीची दखल घेत उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी भर उन्हात काम करणाऱ्या कामगारांना दुपारी १२ वाजेपासून ३ वाजेपर्यंत तीन तासांच्या पगारी रजेची घोषणा केली आहे. तसेच कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
विदर्भ चाळिशीपार; नागपुरात उष्माघाताने ६ मृत्यू
- नवतपामुळे विदर्भात बुधवारीदेखील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा चाळिशीच्या पुढे राहिला. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
- विदर्भात सूर्याचा प्रकोप पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
- वाढत्या तापमानामुळे बुधवारी नागपुरात सहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. आर्द्रता काही प्रमाणात घटल्याने दमट वातावरणाची जाणीव कमी झाली; पण उन्हाच्या झळा मात्र त्रासदायक ठरल्या आहेत.
- दिवसासाेबत रात्रीही उष्ण लहरींचा प्रभाव वाढल्याचे जाणवत आहे.