महाकुंभात मोठा विक्रम... आतापर्यंत ५० कोटी भाविकांचे गंगेत स्नान; CM योगी आदित्यनाथ म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 18:12 IST2025-02-14T18:12:11+5:302025-02-14T18:12:52+5:30
Maha Kumbh 2025 : सध्या सरकारी आकडेवारीनुसार, महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या ५० कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

महाकुंभात मोठा विक्रम... आतापर्यंत ५० कोटी भाविकांचे गंगेत स्नान; CM योगी आदित्यनाथ म्हणाले....
Maha Kumbh 2025 : लखनौ : उत्तर प्रदेशातीलप्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे विधान केले आहे. महाकुंभमेळ्यात ५० ते ५५ कोटी येतील, ज्यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. तसेच, महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी १५०० कोटी रुपये खर्च झाले असून त्या बदल्यात ३ लाख कोटी रुपयांचा फायदा होत आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
सध्या सरकारी आकडेवारीनुसार, महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या ५० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही कार्यक्रमात इतक्या मोठ्या संख्येने लोक सहभागी झाल्याचे पुरावे मिळालेले नाहीत, असे म्हटले जात आहे. दरम्यान, महाकुंभमेळा संपण्यास अजून बराच वेळ आहे. महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान देखील बाकी आहे, जे महाशिवरात्रीला होणार आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ब्राझीलच्या रिओ कार्निव्हल किंवा जर्मनीच्या ऑक्टोबर फेस्टमध्ये जमणारी मोठी गर्दी देखील प्रयागराजमधील आयोजित महाकुंभमेळ्याच्या तुलनेत काहीच नाही. दरम्यान, रिओ कार्निव्हल हा ब्राझीलमधील रिओ डी जानेरो शहरात साजरा केला जाणारा एक मोठा उत्सव आहे. तर ऑक्टोबर फेस्ट हा जर्मनीतील म्युनिक येथे साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे. जो सप्टेंबरच्या शेवटी सुरू होतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी संपतो.
याचबरोबर, आज प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात आणखी एक नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. महाकुंभदरम्यान ३०० स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गंगा आणि संगम नदीवरील राम घाट, गंगेश्वर घाट आणि भारद्वाज घाट या तीन घाटांची अर्धा तास सतत स्वच्छता करून एक नवा विक्रम केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स टीमचे ज्युरी सदस्य प्रवीण पटेल यांच्या देखरेखीखाली हा नवा विक्रम करण्यात आला आहे. महाकुंभमेळ्यात घडलेला हा अनोखा विक्रम याआधी जगात कोणीही केलेला नाही.