यावर्षी सरकारकडून अन्नधान्याची विक्रमी खरेदी, ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 11:17 AM2021-05-15T11:17:12+5:302021-05-15T11:17:20+5:30
पंतप्रधानांनी सांगितले की, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सरकारने १९ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. याचा लाभ जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना होईल.
नवी दिल्ली : शेती आणि बागायतीमध्ये यंदा शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यानुसार, सरकारनेही किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) अन्नधान्याची विक्रमी खरेदी केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १० टक्के अधिक गहू खरेदी एमएसपीवर करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभधारकांच्या खात्यामध्ये वर्ग केला. त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
पंतप्रधानांनी सांगितले की, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सरकारने १९ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. याचा लाभ जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना होईल. पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिल्यांदाच लाभ देण्यात आला आहे. कोरोनासाथीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी सांगितले की, राज्य सरकारांनी औषधी आणि आवश्यक पुरवठ्याचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी. कोरोना हा देशाचा अदृश्य शत्रू असून, त्याचा सामना करीत आहे. त्याच्याशी आपण युद्धपातळीवर दोन हात करीत आहोत.
मोदी यांनी म्हटले की, पंतप्रधान किसान सन्मान योजनेवर सर्व शेतकरी खुश आहेत. पंजाबातील शेतकरी विशेषत: खुश आहेत. अनेक शेतकऱ्यांनी समाजमाध्यमांवर टाकलेले समाधानाचे व्हिडिओ मी पाहिले आहेत.
सेंद्रिय शेतीचे व्यावसायिक मॉडेल विकसित करणाऱ्या मेघालयातील एका शेतकऱ्यास मोदींनी सांगितले की, देशात १० हजार ‘शेतकरी उत्पादक संघटना’ स्थापन करण्यात येत आहेत. तुमचे व्यवसाय मॉडेल तुम्ही लोकप्रिय केले आहे.
मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने २०१९ साली पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. दर तीन महिन्यांनी २ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जातो.
तुम्ही इतरांसमोर उदाहरण ठेवले
पंतप्रधानांनी योजनेच्या काही लाभार्थींशी वार्तालाप केला. बरड जमिनीचे सुपीक जमिनीत रूपांतरित करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका शेतकरी महिलेस मोदींनी सांगितले की, तुम्ही इतरांसाठी एक उदाहरण घालून दिले आहे. तुमचा आत्मविश्वास हा तुमच्या क्षमता आणि अनुभवाबद्दल बोलतो.