खासगीकडून शुल्क वसुली; सरकारीमध्ये नेट बँकिंग समस्या; बँकांच्या कामकाजाविषयी लाखो ग्राहकांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 07:37 AM2022-01-07T07:37:20+5:302022-01-07T07:37:34+5:30
सरकारी, खासगी आणि विदेशी बँकांच्या तक्रारी जवळपास एकसारख्याच आहेत. मात्र, कोणतेही कारण न सांगता वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारण्यामध्ये खासगी बँका आघाडीवर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील बँकांशी संबंधित तक्रारी दरवर्षी वाढत असून, यंदा या तक्रारी तीन लाख ४० हजारांच्या पुढे गेल्या आहेत. एटीएम, डेबिटकार्ड आणि क्रेडिटकार्ड संबंधित सर्वाधिक तक्रारी बँकिंग लोकपालांच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
सरकारी, खासगी आणि विदेशी बँकांच्या तक्रारी जवळपास एकसारख्याच आहेत. मात्र, कोणतेही कारण न सांगता वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारण्यामध्ये खासगी बँका आघाडीवर आहेत. तर, दुसरीकडे मोबाइल, नेट बँकिंगच्या प्रकारांमध्ये सरकारी बँकांचे ग्राहक अधिक तक्रारी करत आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, एका वर्षात एटीएम, डेबिटकार्ड आणि क्रेडिटकार्डशी संबंधित सर्वाधिक ४९ हजार २६८ तक्रारी सरकारी बँकांशी संबंधित ग्राहकांनी केल्या. याबाबत खासगी बँकांशी संबंधित ३७ हजार ८८४ तक्रारी होत्या, तर दुसरीकडे न सांगता वेगवेगळे शुल्क आकारले म्हणून खासगी बँकांच्या ११ हजार ५७७ तक्रारी करण्यात आल्या आहेत.
सरकारी बँकांशी संबंधित अशा तक्रारी ७ हजार ७८९ होत्या.
तर, मोबाइल नेट बँकिंगच्या प्रकारामध्ये सरकारी बँकांच्या ग्राहकांनी सर्वात जास्त २७ हजार ४३८ तक्रारी केल्या. खासगी बँकांशी संबंधित अशा तक्रारी १२ हजार ६४७ राहिल्या आहेत.
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या विरोधात बँकिंग लोकपाल कार्यालयात सर्वात जास्त म्हणजे ७४ हजार ११९ तक्रारी करण्यात आल्या आहेत. २४ हजार ९९८ तक्रारी या पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित होत्या. तर, १६ हजार २६५ तक्रारी या बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनी केल्या आहेत.
खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या विरुद्ध सर्वात जास्त ३४ हजार ४२० तक्रारी करण्यात आल्या आहेत. २८ हजार तक्रारी आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांनी केल्या आहेत. तर, २१ हजार, ११ तक्रारी या ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांनी केल्या आहेत.
बँकांकडून ग्राहकांना सेवा देण्यात काही त्रुटी राहिली तर बँक लोकपाल संबंधित बँकेला निर्देश देतात. देशात ९० च्या दशकापासून बँकिंग लोकपाल अस्तित्वात आहे, मात्र त्याबाबत अद्यापही पुरेशी माहिती अनेकांना नाही.
प्रमुुख बँकांबाबत ग्राहकांच्या तक्रारी
बँक तक्रारी
एसबीआय १९,८६५
एचडीएफसी ११,४७८
पीएनबी ७,१९९
आयसीआयसीआय ६,७४०
आरबीएल ५,६०१