अयोध्येतील राम मंदिरामध्ये पुजाऱ्यांची भरती, अशी आहे पात्रता आणि अटी शर्ती, असा करता येईल अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 08:08 PM2023-10-23T20:08:44+5:302023-10-23T20:09:44+5:30
Ram Mandir: अयोध्येमध्ये बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिरामध्ये नव्या पुजाऱ्यांसाठी भरती निघाली आहे. मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत.
अयोध्येमध्ये बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिरामध्ये नव्या पुजाऱ्यांसाठी भरती निघाली आहे. मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. हे अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे. निवड झालेल्या व्यक्तींना प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर त्यांना सहा महिने प्रशिक्षण दिलं जाईल. या विशेष प्रशिक्षणानंतर त्यांची पुजारीपदावर नियुक्ती होईल. प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांना काही ठरावीक रक्कम मानधन म्हणून दिली जाईल.
अयोध्येतील रामलल्लांची पूजा ही वैष्णव परंपरेतील रामानंदीय परंपरेनुसार होते. त्यामुळे पुजारीपदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी रामानंदीय परंपरेनुसार दीक्षा घेतलेली असली पाहिजे. प्रशिक्षणानंतर पुजारीपदासाठी त्यांची नियुक्ती होणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पुजारीपदासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे.
२२ जानेवारी रोजी राम मंदिरामध्ये भगवान श्री राम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: मंदिर आणि रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मंदिराचा विस्तार आणि भाविकांची वाढती गर्दी विचारात घेता पूजापाठ आदींसाठी ट्रस्टकडून अधिक पुजाऱ्यांची नियुक्ती करण्याची तयारी केली जात आहे.
ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार राम मंदिराच्या सेवेसाठी लवकरच पुजाऱ्यांच्या अनेक पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अयोध्येमधील उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे. प्रवेश परीक्षेनंतर निवडण्यात आलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांपर्यंत प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर पुजारीपदावर त्यांची नियुक्ती होईल. ट्रेनिंगदरम्यान पुजाऱ्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली जाईल. इच्छूक व्यक्तींसाठी वयोमर्यादा ही २० ते ३० वर्षे एवढी आहे. तसेच ते देशाच्या कुठल्याही भागातील रहिवासी असले तरी या पदासाठी अर्ज करू शकतात. इच्छुक व्यक्ती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.