सैन्य दलात भरतीची संधी, 24 जानेवारीपासून करा ऑनलाईन अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 03:18 PM2022-01-22T15:18:51+5:302022-01-22T15:20:20+5:30
इयत्ता 12 वी विज्ञान परीक्षेत 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या भरती परिक्षेसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी, गणित फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांत 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण हवे आहेत.
नवी दिल्ली - सैन्य दलात भरती होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. विशेषत: ग्रामीण भागातील मुलांना सैन्यात भरती होऊन लवकर आपल्या कुटुंबीयांच्या खांद्यावरचं आर्थिक ओझं कमी करायचं असतं. तर, देशसेवेसाठीची नोकरी पत्करत समाजात अभिमानाने चालायचं असतं. त्यामुळे, 10 किंवा 12 वीनंतर सैन्य दलातील भरतीच्या नोकरीसाठी हे युवक प्रयत्न करत असतात. या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. 24 जानेवारीपासून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
इयत्ता 12 वी विज्ञान परीक्षेत 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या भरती परिक्षेसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी, गणित फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांत 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण हवे आहेत. तसेच, उमेदवाराने जेईई मेन्स परीक्षा पास होणे बंधनकारक आहे. या उमेदवारांना वयाची अट ठेवण्यात आली असून साडे 16 ते साडे 19 वर्षांपर्यंतचे उमेदवारच अर्ज करू शकतील.
इच्छुक उमेदवार भारतीय सैन्य दलाच्या वेबसाईटवर या www.joinindianarmy.nic.in जाऊन अर्ज करू शकतात.
उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर त्यातून मुलाखतीसाठी काही उमेदवारांना निवडण्यात येईल.
SSB इंटरव्ह्यूव - ही दोन टप्प्यातील प्रक्रिया आहे. पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच दुसऱ्या टप्प्यात प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर, वैद्यकीय चाचणी परीक्षाही होणार आहे. हे सर्व टप्पे पार केल्यानंतर गुणांच्याद्वारे यादीत झळलेल्या युवकांना ट्रेनिंगसाठी बोलविण्यात येईल.