उमेदवारांना फेर मुलाखतीची प्रतीक्षाच पोलीसपाटील भरती : जिल्हाधिकार्यांच्या निर्णयाकडे लक्ष
By admin | Published: August 10, 2016 11:21 PM2016-08-10T23:21:57+5:302016-08-10T23:25:22+5:30
नाशिक : पोलीसपाटील भरतीत गुणवत्ता असतानाही डावलल्या गेलेल्या अन्यायग्रस्त उमेदवारांना न्याय देण्याचे घोंगडे जिल्हाधिकार्यांवर झटकून मोकळे झालेल्या प्रांत अधिकार्यांच्या अहवालावर महिना उलटूनही निर्णय घेण्यास जिल्हा प्रशासनास वेळ मिळालेला नाही, परिणामी आज ना उद्या न्याय मिळेल या आशेवर असलेल्या उमेदवारांची घालमेल वाढली आहे.
नाशिक : पोलीसपाटील भरतीत गुणवत्ता असतानाही डावलल्या गेलेल्या अन्यायग्रस्त उमेदवारांना न्याय देण्याचे घोंगडे जिल्हाधिकार्यांवर झटकून मोकळे झालेल्या प्रांत अधिकार्यांच्या अहवालावर महिना उलटूनही निर्णय घेण्यास जिल्हा प्रशासनास वेळ मिळालेला नाही, परिणामी आज ना उद्या न्याय मिळेल या आशेवर असलेल्या उमेदवारांची घालमेल वाढली आहे.
एप्रिल महिन्यात लेखी व मे महिन्यात तोंडी मुलाखती घेण्यात आलेल्या पोलीसपाटील भरतीचे कवित्व तीन महिन्यानंतरही सुरूच असून, या भरतीत सिन्नर व निफाड तालुक्यात झालेल्या गैरप्रकारामुळे ही भरती थेट मुंबई उच्च न्यायालय व मॅटमध्ये गाजली. जिल्हाधिकार्यांचे आदेश झुगारून तोंडी परीक्षेत प्रांत अधिकार्याने आपल्या मर्जीने गुणदान करून पात्रांना अपात्र ठरविले, तर अपात्र पात्र ठरल्याने मोठा गदारोळ झाला होता. या भरतीबाबत सिन्नर तहसील कार्यालयातील एक कर्मचारी उमेदवारांकडे सरळ सरळ पैशांची मागणी करीत असल्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्यामुळे तर अन्यायग्रस्त उमेदवारांकडून केल्या जाणार्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना नुसती पुष्टीच मिळाली नाही, तर जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकार्यांनी या प्रश्नी अगोदर घेतलेली आक्रमक भूमिका गळून पडल्यामुळे सार्या प्रकरणात तथ्य असल्याची तक्रार उमेदवारांनी केली होती. आदेश झुगारणार्या प्रांत अधिकार्याबाबत हतबलता व्यक्त करणार्या जिल्हाधिकार्यांनी या सार्या प्रकारणाबाबत उमेदवारांच्या फेर मौखिक मुलाखती घेण्याची सूचनाही प्रांत अधिकार्याने मान्य केली नाही, उलट पक्षी जिल्हाधिकार्यांनीच या उमेदवारांच्या मुलाखती घ्याव्यात, अशी सूचना गेल्या महिन्यात केली. त्यामुळे जिल्हाधिकारी तरी न्याय देतील, अशा आशेवर असलेल्या अन्यायग्रस्त उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजविले, परंतु महिना उलटला पण जिल्हाधिकार्यांनाही त्याकडे बघण्यासाठी वेळ मिळाला नाही. दोन दिवसांपूर्वीच काही उमेदवारांनी प्रशासनातील अधिकार्यांची भेट घेऊन विचारणा केली असता अजून वेळ आहे, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे.
चौकट===
नऊ उमेदवार मॅटमध्ये
जिल्हाधिकार्यांकडे दाद मागूनही मिळत नसल्याचे पाहून निफाड व सिन्नर तालुक्यातील नऊ उमेदवारांनी अखेर मॅटकडे धाव घेतली आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाची सारी कागदपत्रे गोळा करून या उमेदवारांनी मॅटला प्राथमिक पातळीवर बाजू पटवून दिली आहे. त्याची सुनावणी सुरू असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.