देशातील अनेक राज्यात 'रेड अलर्ट'; मुंबईसह रायगडमध्येही पावसाचा जोर वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 10:31 AM2023-07-27T10:31:27+5:302023-07-27T10:33:27+5:30
रायगडमधील सर्व शाळा गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने पुढील दोन दिवस जवळपास संपूर्ण देशात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून पुढील दोन दिवस पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे. रायगडमधील सर्व शाळा गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबईत रात्रभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सकाळी सहा वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD)ने पुढील तीन दिवस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे आणि ऑरेंज ते यलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये २७ जुलै रोजी अतिमुसळधार पावसासाठी रेड अलर्ट आणि २८ जुलैला मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण ओडिशामध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. मलकानगिरी जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील पूरस्थितीही बिकट आहे.
हिमाचलमध्ये राष्ट्रीय महामार्ग बंद
शिमला जिल्ह्यातील रामपूर उपविभागातील सरपारा पंचायतीच्या कंदाहार गावात मंगळवारी रात्री उशिरा एकाच ठिकाणी दोन ढगफुटीनंतर आलेल्या पुरात प्राथमिक शाळा, युथ क्लबच्या इमारतीसह पाच घरे वाहून गेली. सफरचंद बागांचे नुकसान झाले आहे. अनेक गुरेही वाहून गेली आहेत. त्याचवेळी, ब्रोनी आणि ज्यूरी येथे भूस्खलनामुळे शिमला-किन्नौर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. चंबा, कांगडा, सिरमौर, शिमला, बिलासपूर, हमीरपूर, कुल्लू, मंडी आणि किन्नौर जिल्ह्यात पुढील २४ तासांसाठी पुराचा इशारा जारी करण्यात आला आहे. लोकांना नदी-नाल्यांजवळ न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हरियाणा-पंजाबमध्ये मोठे नुकसान
हरियाणा आणि पंजाबमधील कर्नाल, हिस्सार आणि रोहतकमध्ये पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बाजारपेठा, वसाहतींसह शेकडो एकरातील पिके पाण्यात बुडाली आहेत. पंजाबमध्येही सतलजच्या पाण्याने फाजिल्कामध्ये १५०० एकर पिके पाण्याखाली गेली आहेत. फिरोजपूरमधील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.