खलिस्तानी दहशतवादाची पाळेमुळे उखडून टाकण्याची मोहीम तीव्र; 'या' दहशतवाद्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 08:50 AM2023-09-26T08:50:01+5:302023-09-26T08:53:07+5:30
करणवीर सिंग हा वाधवा सिंग आणि हरविंदर सिंग रिंडा या दहशतवाद्यांचा उजवा हात असल्याचे म्हटले जाते.
खलिस्तानी दहशतवाद्यांना कॅनडात आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून कॅनडासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची भूमिका अधिक कठोर झाली आहे. खलिस्तानी दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सरकारने उघडपणे दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारच्या विनंतीवरून इंटरपोलने सोमवारी प्रतिबंधित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलचा (Babbar Khalsa International) सदस्य करणवीर सिंग (Karanvir Singh) याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
करणवीर सिंग हा वाधवा सिंग आणि हरविंदर सिंग रिंडा या दहशतवाद्यांचा उजवा हात असल्याचे म्हटले जाते. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करणवीर सिंग सध्या पाकिस्तानात लपला आहे. इंटरपोल पोर्टलनुसार, करणवीर सिंग (38) हा मूळचा पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील रहिवासी आहे. इंटरपोलनेही या खलिस्तानी दहशतवाद्याविरुद्ध जारी केलेली नोटीस आपल्या वेबसाइटवर अपडेट केली आहे. भारतात दहशतवादी घटनांसाठी निधी उभारणे, कट रचणे आणि संघटना तयार करणे यासह अनेक गंभीर प्रकरणांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
फुटीरतावादी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यात राजनैतिक तणाव असताना खलिस्तानी दहशतवादी करणवीर सिंगविरोधात इंटरपोलची नोटीस जारी करण्यात आली आहे. दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारताने आपल्या देशांतर्गत राजकारणाच्या दबावाखाली हरदीप सिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला होता, त्यावर भारताने याचे जोरदार खंडन करत चोख प्रत्युत्तर दिले होते.
रेड कॉर्नर नोटीस का जारी केली जाते?
इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी करणे म्हणजे संबंधित देशांचे पोलीस आरोपीला शोधतात आणि त्याचे प्रत्यार्पण किंवा अन्य कायदेशीर कारवाई होईपर्यंत त्याला आपल्या ताब्यात ठेवतात. दरम्यान, इंटरपोलने यापूर्वी गँगस्टर हिमांशू उर्फ भाऊच्या विरोधात सर्व सदस्य देशांना रेड नोटीस बजावली होती. हिमांशू परदेशात राहत असल्याचे समजते. हरयाणा पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, रोहतक पोलिसांना एका मोस्ट वाँटेड आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात यश आले आहे, जो परदेशात पळून गेला आहे.