भारतासाठी लाल समुद्र विश्वासार्ह मार्ग, अमेरिकेच्या एका निर्णयामुळे तणाव, जगासाठी इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 05:28 PM2024-01-13T17:28:01+5:302024-01-13T17:30:01+5:30
लाल समुद्रात तणावाची (रेड सी वॉर) परिस्थिती निर्माण झाली आहे.
नवी दिल्ली: ऑक्टोबरमध्ये इस्रायल-हमास युद्धानंतर लाल समुद्रात मालवाहतूक करणाऱ्या जहाजांवरही हल्ले सुरू झाले. हमासला पाठिंबा देण्यासाठी, हूती बंडखोरांनी इजिप्तच्या सुएझद्वारे येमेनमधून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य केले आहे. आता याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ब्रिटनसह गेल्या दोन दिवसांत येमेनमधील हूती बंडखोरांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत, त्यानंतर हूतींनी पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
या घटनेमुळे लाल समुद्रात तणावाची (रेड सी वॉर) परिस्थिती निर्माण झाली आहे. हल्ल्याची वाढती भीती लक्षात घेऊन कंपन्या निर्यात शिपमेंट थांबवत आहेत. अमेरिकेनेही जहाजांना लाल समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. या हल्ल्याचा भारतावर थेट परिणाम झालेला नाही. परंतु जागतिक समस्या पाहता भारताच्या निर्यात आणि आयात व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
जगभर महागाई वाढेल
भारतासह अनेक देश या मार्गावरून कच्च्या तेलापासून ते कपडे, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, खाद्यपदार्थ आणि इतर सर्व गोष्टींची आयात आणि निर्यात करतात. नवीन मार्गाने निर्यात करावी लागली किंवा शिपमेंट थांबवली, तर भारतासह संपूर्ण जगात जागतिक महागाई आणखी वाढेल.
भारताच्या निर्यातीत ३० अब्ज डॉलर्सची घट होण्याची शक्यता
नवी दिल्लीच्या थिंक टँक रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर डेव्हलपिंग कंट्रीजने एक मूल्यांकन सादर केले आहे. अहवालात म्हटले आहे की, लाल समुद्र हा भारतासाठी सर्वात विश्वासार्ह मार्ग आहे आणि येथून निर्यात-आयातीचा खर्च इतर मार्गांपेक्षा स्वस्त आहे. अशा स्थितीत लाल समुद्रातील (रेड सी वॉर) तणावामुळे तिथून जाणाऱ्या जहाजांमध्ये ४४ टक्के कपात होऊ शकते. भारताच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या ४५१ अब्ज डॉलरच्या तुलनेत यावर्षी ६ ते ७ टक्क्यांनी घट होऊ शकते. याचा अर्थ भारताची निर्यात ३० अब्ज डॉलरने कमी होऊ शकते.
हूती बंडखोर कोण आहेत?
१९८०च्या दशकात येमेनमध्ये हुतींचा उदय झाला. शिया मुस्लिमांची ही सर्वात मोठी आदिवासी संघटना आहे. अब्दुल्ला सालेहच्या आर्थिक धोरणांमुळे हूतींना राग आला, ज्यामुळे येमेनच्या उत्तरेकडील प्रदेशात अराजगता वाढली आणि सन २०००मध्ये हूतींनी सैन्य तयार केले. अब्दुल्ला सालेहच्या सैन्याने २००४ ते २०१० दरम्यान हूतींसोबत ६ युद्धे लढली. २०११मध्ये अरबांच्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध थांबले आणि सुमारे दोन वर्षे चर्चा सुरू राहिली. पण तोडगा निघाला नाही. यानंतर, हूतींनी सौदी अरेबिया समर्थित नेते अहमद रब्बो मन्सूर हादी यांना सत्तेवरून हटवले आणि येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली. हूतीकडे असलेले सैनिक टँक, अँटी-टँक क्षेपणास्त्रे, लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि अगदी तांत्रिक वाहने चालविण्यास सक्षम आहेत.