दोन वर्षे कष्ट कमी करा, हार्ट अटॅक टाळा; कोरोना संसर्ग झालेल्यांना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 08:31 AM2023-10-31T08:31:06+5:302023-10-31T08:31:33+5:30
गुजरातमध्ये गरबा खेळताना २४ तासांत १० तरुणांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता.
अहमदाबाद : कोरोना साथीनंतर देशभरात तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच गुजरातमध्ये गरबा खेळताना २४ तासांत १० तरुणांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी गंभीर कोरोना संसर्ग झालेल्यांनी व्यायाम करताना जास्त मेहनत करू नये आणि काही काळ कठोर परिश्रमापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
मंत्री काय म्हणतात?
ते म्हणाले की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) या विषयावर सविस्तर अभ्यास केला आहे आहे यात गंभीर कोरोना संसर्ग झालेल्यांनी दोन वर्षांपर्यंत अधिक मेहनत करू नये असे म्हटले आहे.
नेमके काय होतेय?
- कोरोना संसर्गामुळे हृदय आणि रक्तवाहिन्या प्रभावित झाल्या आहेत. लोकांच्या हृदयाचे स्नायू कमकुवत झाले आहेत. हृदयाचे ठोके अचानक कमी होण्याची लक्षणेही दिसून आली आहेत.
- रक्ताच्या गुठळ्यांमुळे हृदयविकाराचा झटका, सेरेब्रल स्ट्रोक येत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या मृत्यूंचा संबंध कोरोनाशी आहे का, याचा अभ्यास आयसीएमआर करत आहे.
तरुणांमध्ये अधिक प्रमाण
- २०२१ नंतर २० आणि ३० वयोगटातील तरुणांना हृदयविकाराचा झटका येत त्यांचा मृत्यू होण्याची अधिकाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.
- अनेक लोक या मृत्यूंचा संबंध कोरोना किंवा त्याच्या उपचारांशी जोडत आहेत.
- गुजरातमध्ये नुकतेच गरबा खेळताना १७ वर्षीय मुलाला हार्ट अटॅक आल्याने यात त्याचा मृत्यू झाला होता.