लसीकरण, घटत्या रुग्णांमुळे कोरोनाची धास्ती झाली कमी, १ कोटी १ लाख रुग्ण झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 04:39 AM2021-01-17T04:39:28+5:302021-01-17T07:09:23+5:30
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात १०५४२८४१ कोरोना रुग्ण असून, त्यातील १०१७९७१५ जण बरे झाले आहेत.
नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला असतानाच दुसऱ्या बाजूस नव्या रुग्णांची संख्याही कमी होत आहे. शनिवारी कोरोनाचे सव्वा पंधरा हजारांहून कमी नवे रुग्ण आढळून आले. लसीकरणाचा प्रारंभ व घटती रुग्णसंख्या यामुळे चिंता कमी होण्यास मदत झाली आहे. सध्या २११०३३ उपचाराधीन रुग्ण असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत २ टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात १०५४२८४१ कोरोना रुग्ण असून, त्यातील १०१७९७१५ जण बरे झाले आहेत. कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांच्या संख्येतही घट होत असून, शनिवारी १७५ जणांचा बळी गेला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १५२०९३ झाली आहे. या संसर्गातून बरे झालेल्यांचे प्रमाण ९६.५६ टक्के असून, मृत्यूदर १.४४ टक्के आहे.
जगभरात ९ कोटी ४३ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ६ कोटी ७३ लाख रुग्ण बरे झाले तर बळींचा आकडा २० लाखांवर गेला आहे. अमेरिकेमध्ये २ कोटी ४१ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील १ कोटी ४२ लाख रुग्ण बरे झाले व चार लाखांहून अधिक जणांचा बळी गेला आहे.
..तर भारत बायाेटेक देणार नुकसानभरपाई
या लसीचे काही दुष्परिणाम झाल्यास कंपनी नुकसान भरपाई देणार असल्याचे भारत बायोटेकने जाहीर केले. लसीमुळे गंभीर आजार किंवा स्थिती उद् भवल्यास नुकसानभरपाई देण्यात येईल. मात्र, तसे सिद्ध करावे लागेल, असे कंपनीने म्हटले आहे.
यांनी घेतली लस -
अनिल विज - भारत
ज्यो बायडेन - अमेरिका
कमला हॅरिस - अमेरिका
माईक पेन्स - अमेरिका
राणी एलिझाबेथ - ब्रिटन
प्रिन्स फिलीप - ब्रिटन
बेंजामिन नेतान्याहू - इस्रायल
युली एडेलस्टिन - इस्रायल
सलमान बिन - सौदी अरेबिया
अल् सौद
पोप फ्रान्सिस - व्हॅटिकन सिटी
माजी पोप बेनेडिक्ट - व्हॅटिकन सिटी
जोको विडोडो - इंडोनेशिया
सरकारी रुग्णालयांत कोवॅक्सिन तर खासगी रुग्णालयांत कोविशिल्ड -
दिल्लीत लसीकरण मोहिमेत सरकारी रुग्णालयांत कोवॅक्सिन तर खासगी रुग्णालयांत कोविशिल्ड ही लस देण्यात येत आहे. असा भेदभाव का करण्यात आला असा सवाल काही जणांनी उपस्थित केला आहे. दिल्लीतील सरकारी रुग्णालयांत कोवॅक्सिन तर ४२ खासगी रुग्णालयांत कोविशिल्ड ही लस देण्यात आली. कोणती लस कुठे पाठवायची याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.
राममनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांचा कोवॅक्सिन लस घेण्यास नकार -
दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी कोवॅक्सिन लस टोचून घेतली नाही. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही कोवॅक्सिन ही लस घेणार नाही.
कोविशिल्ड लस सुरक्षित असून तिच्या सर्व चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. या पत्राबाबत राममनोहर लोहिया रुग्णालयात्चे अधीक्षक डॉ. ए. के. राणा यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. कोवॅक्सिन ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे.
गोव्यात सातशे कर्मचाऱ्यांना कोविड विरोधी लस -
पणजी : बांबोळीच्या गोमेकॉ रुग्णालयात मल्टी टास्क आरोग्य कर्मचारी म्हणून काम करणारा रंगनाथ भजजी हा शनिवारी, गोव्यात कोविडविरोधी लस घेणारा पहिला कर्मचारी ठरला. राज्यात एकूण सात ठिकाणी दिवसभरात ७०० जणांनी कोविडविरोधी लस घेतली.
लसीकरणास बांबोळीच्या गोमेकॉ रुग्णालयातून आरंभ झाला. त्यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशेष उपस्थिती होती. रंगनाथ भजजी हे गोमेकॉमध्ये सफाईचेही काम करतात. ते वाडे सुकूर येथील आहेत.