पीएफवरील व्याजदरात कपात; नवा व्याजदर ८.१ टक्के, पाच कोटी सदस्यांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 06:32 AM2022-03-13T06:32:25+5:302022-03-13T06:32:31+5:30
चार दशकांनंतर प्रथमच नीचांकी
नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील (पीएफ) व्याजदरात कपात करण्याचा निर्णय भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) घेतला आहे. त्यामुळे आता हा व्याजदर ८.१ टक्के असेल. गेल्या चार दशकांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. यापूर्वी १९७७-७८ या आर्थिक वर्षात पीएफवरील व्याजदर ८ टक्के होता. सध्याचा व्याजदर ८.५ टक्के आहे. ईपीएफओच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचा पाच कोटी सदस्यांना फटका बसणार आहे.
ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या शनिवारी झालेल्या बैठकीत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२०-२१ या वर्षासाठी पीएफचा व्याजदर ८.५ टक्के ठेवण्याचा निर्णय मार्च २०२१ मध्ये घेण्यात आला होता. त्याला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वित्त मंत्रालयाने मंजुरी दिली होती. दरम्यान, या निर्णयावर अनेक राजकीय पक्षांनी टीका केली आहे.
मतदारांना ‘रिटर्न गिफ्ट’; विराेधकांचा टाेला
पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला भरभरून मते दिली. पंजाब वगळता चारही राज्यांमध्ये भाजपने सत्ता टिकवली. आता या निवडणूक विजयाचे मतदारांना ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून पीएफचा व्याजदर घटविण्यात आला आहे. देशातील ८४ टक्के लोकांचे उत्पन्न त्यामुळे घटणार आहे. निवडणूक विजयाच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या बचतीवर असा हल्ला करणे कितपत योग्य आहे? - रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे प्रवक्ते.