गृहकर्जावरील व्याजदरात पाव टक्के कपात शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 03:24 AM2020-01-03T03:24:05+5:302020-01-03T03:24:18+5:30
लवकरच निर्णय; एलआयसीची सुरुवात
मुंबई : स्टेट बँकेने गृहकर्जावरील व्याजदरात कपात केल्याने आता गृहकर्ज देणाऱ्या सर्व कंपन्यांनीही दर कमी करण्याचे ठरविले आहे. त्याचा फायदा कर्ज घेणाºया नोकरदारांना होईल. सर्व हाउसिंग फायनान्स कंपन्या लवकरच पाव टक्क्याने दर कमी करतील, असे सांगण्यात आले.
एलआयसी हाउसिंग फायनान्सने आधीच व्याजदरामध्ये पाव टक्का कपात केली आहे. गृहकर्जासाठीच्या अर्जात महिलेचे नाव असेल, तर त्यांच्याकडून कमी दर आकारण्याचेही एलआयसी हाउसिंगने जाहीर केले. पाठोपाठ एचडीएफसी, इंडिया बुल्स हाउसिंग तसेच पीएनबी हाउसिंग फायनान्स हेही तसाच निर्णय घेतील, असे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी, पीएनबी हाउसिंग फायनान्स व इंडिया बुल्स हाउसिंगही व्याजदरात कपात करण्याचा विचार करीत आहेत.
सर्वच हाउसिंग फायनान्स कंपन्यांच्या अॅसेट लायबिलिटी समित्यांची बैठक जानेवारीतच असून, त्यात याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. घरांसाठी कर्ज देणाºया कंपन्यांमध्येही मोठी स्पर्धा आहे. सर्वांचे व्याजदर सारखेच असतात. अशा वेळी एका कंपनीने दर कमी केला की इतरांनाही त्याचे अनुकरण करावे लागते. त्याचमुळे एलआयसी हाउसिंगनंतर या कंपन्यांनी व्याजदरात कपातीची शक्यता वर्तविली आहे.