भारतातील मुस्लिम सुरक्षित आहेत म्हणत जिहादीने दिला होता हल्याला नकार
By Admin | Published: February 24, 2016 01:40 PM2016-02-24T13:40:55+5:302016-02-24T13:55:07+5:30
'भारतातील मुस्लिमांची परिस्थिती इतर देशांशी तुलना करता चांगली आहे', असं म्हणत जिहादी अब्दुल अजिज उर्फ गिद्दाह याने भारतावर हल्ला करण्यास नकार दिला होता
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २४ - 'भारतातील मुस्लिमांची परिस्थिती इतर देशांशी तुलना करता चांगली आहे', असं म्हणत जिहादी अब्दुल अजिज उर्फ गिद्दाह याने भारतावर हल्ला करण्यास नकार दिला होता. अब्दुल अजिज उर्फ गिद्दाह याला १९९७ साली भारतावर हल्ला कऱण्याची सुचना करण्यात आली होती. मात्र भारतात मुस्लिम सुरक्षित आहेत सांगत त्याने हल्यास नकार दिला होता.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्ताप्रमाणे १९९७ मध्ये हँण्डलर मोहम्मद इस्माईल आणि लष्कर-ए-तोयबा ऑपरेटीव्ह सलीम जुनेदने अजिजला भारतात जिहाद पुकारण्यास सांगितले होते. मात्र अजिजने भारतात याची गरज नाही असं सांगितल होतं. भारतातील मुस्लिमांची परिस्थिती इतर देशांतइतकी वाईट नाही आहे असं सांगत अजिजने भारतात जिहाद पुकारण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर सौदीमधील एनजीओ इंटरनॅशनल इस्लामिक रिलीज ऑर्गनायजेशनचा प्रमुख शेख अहमद याने बाबरी मशिदीच्या घटनेचा उल्लेख करत अजिजचं मन वळवलं आणि भारतात जिहाद पुकारण्यासाठी त्याला तयार केले. शेख अहमदने अजिजला या कामासाठी ९.५ लाख रुपये दिले होते.
२००५मध्ये अब्दुल अजिजला सौदीमध्ये अटक करण्यात आली होती. अब्दुल अजिज आंध्रप्रदेशात बॉम्बस्फोट घडवून आणल्याप्रकरणी आरोपी आहे. सौदीमधील तेलाची ठिकाणे उडवून देण्याच्या कट रचल्याप्रकरणी २००५मध्ये सौदीमध्ये जिहादी अब्दुल अजिजला अटक करण्यात आली होती. सौदीमध्ये १० वर्ष कारावास भोगल्यानंतर त्याला २ फेब्रुवारीला भारताच्या हवाली करण्यात आलं.
अब्दुल अजिजला हैद्राबाद पोलिसांनी २००१मध्ये शहरांत स्फोट घडवून आणण्यासाठी स्फोटक तसंच हत्यारांचा साठा केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. डिसेंबर महिन्यात त्याला जामीनदेखील मंजूर झाला होता. यादरम्यान त्याने बांग्लादेशला पळून जाण्याची योजना आखली. ३५ हजार रुपये देऊन त्याने बोगस पासपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र पासपोर्ट न मिळाल्याने तो पुन्हा भारतात परतला होता. अजिजने हैद्राबादमधील ८ तरुणांना आईडी बनवण्याचं प्रशिक्षणदेखील दिलं होतं मात्र त्यांना आंध्रप्रदेश पोलिसांनी अटक केली. अटकेच्या भीतीने त्याने बंगळुरु आणि हावडामार्गे बांग्लादेशला पळ काढला होता.
अब्दुल अजिजने इराकला जाऊन अमेरिकेशी लढण्याची योजनादेखील आखली होती. २००५मध्ये अब्दुल अजिज गल्फ एअरवेजच्या विमानाने जेद्दाहला गेला होता जिथे शकील नावाच्या पाकिस्तानी नागरिकाकडे त्याने वास्तव्य केलं. अजिज आपल्या पुढच्या जिहादी कामगिरीसाठी इराकला जात असतानाच सौदीमध्ये त्याला अटक करण्यात आली. सौदीमध्ये अब्दुल अजिजला ८ वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली मात्र त्याला १० वर्षाहून अधिक काळ तुरुंगात राहावे लागले. २ वर्ष जास्त कारागृहात राहाव लागल्याने सौदी सरकारने त्याला भरपाईदेखील दिली आहे.