मोदी सरकारचे यू - टर्न, सुभाषचंद्र बोस यांची फाईल सार्वजनिक करण्यास नकार
By admin | Published: December 1, 2014 09:54 AM2014-12-01T09:54:40+5:302014-12-01T10:00:45+5:30
केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा यु टर्न घेत स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूशी संबंधीत फाईल्स सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा यु टर्न घेत स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूशी संबंधीत फाईल्स सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने वारंवार या फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.
जानेवारीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजनाथ सिंह यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंदर्भातील फाईल्स सार्वजनिक करावी अशी मागणी केली होती. सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंदर्भातील माहिती जाणून घेणे हा जनतेचा अधिकार असल्याचे सिंह यांनी म्हटले होते. आता राजनाथ सिंह हे गृहमंत्री असून या मागणीचा भाजपालाही विसर पडल्याचे दिसते. माहिती अधिकारांतर्गत दाखल झालेल्या अर्जावर उत्तर देताना पंतप्रधान कार्यालयाने या फाईल्स सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. या संदर्भात एकूण ४१ फाईल्स असून त्या बाबतीत आम्ही यूपीए सरकारचे धोरण कायम ठेवणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले. या फाईल्स सार्वजनिक केल्याने विदेश संबंधांवर परिणाम होतील त्यामुळेच ही माहिती जाहीर करता येत नाही असा दावाही कार्यालयाने केला आहे.