जैन मुनींच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्यास नकार, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 05:06 PM2023-07-11T17:06:53+5:302023-07-11T17:07:52+5:30
चौकशीतील प्रगतीबद्दल पोलिसांची प्रशंसा
हुबळी (कर्नाटक) : बेळगाव जिल्ह्यातील जैन मुनींच्या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यास कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सोमवारी नकार दिला. त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीतील प्रगतीबद्दल पोलिसांची प्रशंसा केली आहे. नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांची चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावात हत्या करून त्यांचा मृतदेह रायबाग तालुक्यातील खटकभावी गावातील बोअरवेलमध्ये टाकण्यात आला होता.
‘अशा बाबतीत कोणीही राजकारण किंवा भेदभाव करणार नाही,’ असे परमेश्वरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तक्रार नोंदवून आरोपींना अटक केली. बोअरवेलमध्ये टाकलेले मृतदेहाचे तुकडेही हस्तगत केले आहेत. जलद कारवाईसाठी मी पोलिसांचे कौतुक करतो, असे ते म्हणाले.
जैन संत वरुरु गुणाधर नंदी महाराज यांची भेट
या घटनेच्या निषेधार्थ हुबळी येथे आंदोलन करणारे जैन संत वरुरु गुणाधर नंदी महाराज यांची आपण भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. मी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या व अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांना दिले, असेही गृहमंत्री म्हणाले. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘पोलिस खाते सक्षम असून, आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या सीबीआय किंवा इतर तपास यंत्रणांकडे सोपवण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून, तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य समोर येईल.’