धक्कादायक! गर्भवतीला ३ रुग्णालयांनी नाकारले उपचार; रिक्षात प्रसूती झाल्यानंतर बाळाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 05:02 PM2020-07-21T17:02:37+5:302020-07-21T17:12:55+5:30
मध्यरात्री ३ पासून प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर ६ तास वणवण; पण ३ रुग्णालयांचा दाखल करण्यास नकार
बंगळुरू: प्रसुतीकळा सोसत असलेल्या महिलेला दाखल करून घेण्यास रुग्णालयांनी नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार बंगळुरूत घडला आहे. अखेर के. सी. सामान्य रुग्णालयासमोर एका रिक्षात महिलेची प्रसूती झाली. मात्र यानंतरही नवजात अर्भकाला वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाला. प्रसूतीकळा सुरू असताना महिला श्रीरापुरा सरकारी रुग्णालय, व्हिक्टोरिया रुग्णालय आणि व्हिक्टोरियाच्या प्रसूती विभागात गेली होती. मात्र तिला बेड उपलब्ध नसल्याचं उत्तर मिळालं.
बंगळुरूत राहणाऱ्या महिलेला मध्यरात्री ३ वाजता प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर ती तीन रुग्णालयांमध्ये गेली. मात्र बेड उपलब्ध नसल्यानं रुग्णालयांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. जवळपास ६ तास महिला प्रसूतीकळा सहन करत महिला फिरत होती. मात्र तरीही कोणत्याही रुग्णालयानं तिला दाखल करून घेतलं नाही. अखेर रिक्षात महिलेची प्रसूती झाली. त्यानंतर रिक्षा चालक तिला घेऊन के. सी. रुग्णालयात पोहोचला. तिथेही तिला आणि तिच्या नवजात अर्भकाला उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे महिलेचं बाळ दगावलं.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विट करून या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'प्रसूतीकळा सहन करत असलेल्या महिलेला बंगळुरूच्या अनेक रुग्णालयांनी उपचार नाकारले. तिनं एका रिक्षात बाळाला जन्म दिला. मात्र ते बाळ दगावलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दाखल घेऊन तत्काळ कारवाई करावी,' असं आवाहन सिद्धरामय्या यांनी केलं आहे.
योग्य वेळेत उपचार न मिळाल्यानं कर्नाटकमध्ये अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात आता गर्भवती महिलेलादेखील उपचार मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पांनी महिलेला उपचार नाकारणाऱ्या सर्व रुग्णालयांचे परवाने रद्द करावेत. या प्रकरणात फक्त कारवाईचा इशारा देऊन भागणार नाही. तर प्रत्यक्ष कारवाई करावी लागेल, असं सिद्धरामय्या यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.