...अन् क्लार्कने गरीब विधवा महिलेला बनविले करोडपती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 01:56 PM2019-08-02T13:56:40+5:302019-08-02T13:57:06+5:30
भ्रष्टाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टर्मवेळी आवाज उठविला खरा, पण दुसरी टर्म सुरु झाली तरीही काही भ्रष्टाचार कमी व्हायचे नाव घेत नाहीय.
अयोध्या : भ्रष्टाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टर्मवेळी आवाज उठविला खरा, पण दुसरी टर्म सुरु झाली तरीही काही भ्रष्टाचार कमी व्हायचे नाव घेत नाहीय. याचा फटका लाच देण्यास नकार देणाऱ्या विधवा महिलेला बसला आहे. उत्पन्न प्रमाणपत्र बनविण्यास गेलेल्या या महिलेला या कारकुनाने चक्क करोडपती असल्याचे प्रमाणपत्र देत सरकारी अनुदानापासून वंचित ठेवल्याचा प्रताप समोर आला आहे.
तारा देवी या विधवा आहेत. त्यांच्या मुलाला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी तहसील कार्यालयात फेऱ्या घातल्या. मात्र, तेथील लेखापालाने त्यांच्याकडे लाचेची मागणी केली. त्यांना शेवटच्या दिवशी 30 जुलैला उत्पन्नाचा दाखला मिळाला खरा पण त्यावर त्यांचे उत्पन्न 5 कोटी असल्याचे पाहून धक्काच बसला. गेल्या दोन दिवसांपासून ही महिला न्यायासाठी तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. तिची एकच चूक होती, की तिने या क्लार्कला लाच देण्यास नकार दिला. या महिलेला न्याय न मिळाल्याने तिने मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे.
या क्लार्कने तिच्या दाखल्यावर उत्पन्न पाच कोटी 20 लाख रुपये एवढे दाखविले आहे. यामुळे तिच्या मुलाला शिष्यवृत्तीसाठीही वंचित रहावे लागले आहे. महत्वाचे म्हणजे शिष्यवृत्तीसाठी 30 जुलै ही शेवटची तारीख होती. त्याच दिवशी हा दाखला देण्यात आला. यामुळे या मुलाला अर्जच करता आलेला नाही.
तारादेवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागितला आहे. या प्रकरणाची वाच्यता झाल्याने तहसील कार्यालयातही गोंधळ उडाला आहे. मात्र, या क्लार्कविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तारादेवी यांनी क्लार्क धीरेंद्र प्रताप यादव यांच्यावर लाच मागितल्याच आरोप केला आहे. लाच देण्यास नकार दिल्याने त्याने मनमानी करत करोडोंचे उत्पन्न दाखविले आहे. यामध्ये या महिलेचे महिन्याचे उत्पन्न 43 लाख 33 हजार 766 रुपये 67 पैसे आणि वार्षिक उत्पन्न पाच कोटी 20 लाख पाच हजार दोनसे रुपये दाखविण्यात आली आहे.