भाजपाविरोधात प्रादेशिक आघाडी
By admin | Published: October 7, 2014 05:22 AM2014-10-07T05:22:57+5:302014-10-07T05:22:57+5:30
पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या राज्यांमधील प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे राजकारण करीत असल्याने भाजपाविरोधात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांनी जोरदार आघाडी उघडली आहे.
संदीप प्रधान, मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ््या राज्यांमधील प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे राजकारण करीत असल्याने भाजपाविरोधात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांनी जोरदार आघाडी उघडली आहे.
विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चा अखेरच्या टप्प्यात असताना भाजपाने शिवसेनेची साथ सोडली. स्वतंत्र निवडणूक लढवण्याची वेळ सर्वच पक्षांवर आली. हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्रात भाजपाने आपला मित्रपक्ष असलेल्या प्रादेशिक पक्षाला दगा दिला. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत मोदींना पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांना असाच भाजपाने दगा दिला होता. त्यामुळे राज ठाकरे हे अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, की गुजरातचे? असा थेट सवाल केला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे निकालानंतर भाजपा व शिवसेना एकत्र येतील, अशी भाषा करीत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अगोदर युती का तोडली, असा सवाल करीत आहेत. त्यामुळे राजकारणात परस्परांचे विरोधक असलेले उद्धव व राज हे सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून मोदींच्या गुजरातचा टेंभा मिरवण्यावर प्रहार करीत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही भाजपाच्या जाहिरातीमधून महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचा मुद्दा मांडत आहेत. तर राष्ट्रवादी व त्यांची व्होटबँक असलेल्या मराठा समाजाला भाजपाविरुद्ध चेतवण्याचा प्रयत्न शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केला आहे. शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी या पक्षाच्या हमखास विजयाची खात्री असलेल्या जागा सोडता अन्यत्र ज्या पक्षाच्या उमेदवारांना प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात विजयाची संधी दिसत असेल अशा उमेदवाराला मते ट्रान्सफर करण्याची खेळी करून भाजपाला रोखण्याची रणनिती हे तीन पक्ष राबवू शकतात, असे काही नेत्याचे मत आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला वेळीच महाराष्ट्रात रोखले नाही तर हा भाजपा आपल्यालाही गिळंकृत करील हे तिघांच्याही लक्षात आले आहे.