निवडणूक न लढविणाऱ्या पक्षांची नाेंदणी रद्द करा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 04:10 PM2021-09-10T16:10:17+5:302021-09-10T16:10:25+5:30
आयोगाची कायदे मंत्रालयाकडे मागणी
नवी दिल्ली : केवळ नावापुरतेच अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयाेग सरसावले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एकही निवडणूक न लढविलेल्या राजकीय पक्षांची नाेंदणी रद्द करण्याचे अधिकार देण्याची मागणी आयाेगाने कायदे मंत्रालयाकडे केली आहे.
निवडणूक आयाेगाने गाेळा केलेल्या माहितीनुसार २७०० पक्ष नाेंदणीकृत आहेत. मात्र, त्यांना मान्यता नाही. हे पक्ष देणगी स्वरूपात मिळालेल्या निधीवर कर सवलतींचा लाभ घेत आहेत. मात्र, निवडणूक आयाेगाला संशय आहे, की हवाला आणि मनी लाँडरिंगमध्ये हे पक्ष गुंतल्याचा दाट संशय आहे.
राजकीय पक्षांना देणगी तसेच उत्पादनाची माहिती निवडणूक आयाेगाला देणे बंधनकारक आहे. मात्र, या पक्षांकडून काेणतीही माहिती पुरविण्यात येत नसल्याचे आयाेगाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची नाेंदणी रद्द करण्याची परवानगी देण्याची मागणी आयाेगाने केली आहे. त्यावर कायदे मंत्रालयाकडून लवकरच निर्णय घेण्यात येईल.
नोंदणी केली रद्द
पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. उत्तर प्रदेशात असे सर्वाधिक पक्ष आहेत. आयाेगाने २०१६ मध्ये देशातील २५५ पक्षांची नाेंदणी रद्द केली हाेती.