१५ ते १८ वयोगटातील मुलांची आजपासून लसीसाठी नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 06:00 AM2022-01-01T06:00:51+5:302022-01-01T06:01:17+5:30
Corona Vaccination : मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले.
मुंबई : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे ३ जानेवारीपासून लसीकरण केले जाणार आहे. मुंबईतील नऊ ठिकाणी नऊ लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. यासाठी १ जानेवारीपासून ऑनलाईन नाव नोंदणीला सुरुवात होणार आहे. केवळ कोव्हॅक्सिन लस दिली जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पालिका, शासकीय व खासगी अशी एकूण ४५१ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
आता १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मोहीम ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानुसार सध्या २००७ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्म झालेल्या मुलांना लस घेता येणार आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातील लसीकरणाची सुरुवात जम्बो लसीकरण केंद्रामध्ये किंवा मोकळ्या रुग्णालयांमध्ये केली जाणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.