एनआरआयच्या विवाहांची नोंदणी ४८ तासांत करा- मेनका गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:52 PM2018-06-07T23:52:59+5:302018-06-07T23:52:59+5:30
अनिवासी भारतीय व्यक्तीने भारतामध्ये केलेल्या विवाहाची नोंदणी ४८ तासांमध्ये करायला हवी, असे आदेश केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्री मेनका गांधी यांनी दिले आहेत.
नवी दिल्ली : अनिवासी भारतीय व्यक्तीने भारतामध्ये केलेल्या विवाहाची नोंदणी ४८ तासांमध्ये करायला हवी, असे आदेश केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्री मेनका गांधी यांनी दिले आहेत. अनेक अनिवासी भारतीय पुरुष इथे विवाह करून निघून जातात आणि महिलेची फसवणूक होते, असे आढळून आल्याने हे आदेश देण्यात आले आहे.
अनिवासी भारतीयांच्या विवाहाबाबत आपल्याकडे स्वतंत्र असे नियम नाहीत. मात्र विधी आयोगाने या विवाहांची ३0 दिवसांमध्ये नोंदणी व्हायला हवी अशा सूचना दिल्या असून, त्यानंतर प्रत्येक दिवसाला ५ रुपये दंड आकारला जावा, असेही सुचविले आहे.
मेनका गांधी म्हणाल्या की, सर्व अनिवासी भारतीय व्यक्तींच्या इथे झालेल्या विवाहाची नोंदणी ४८ तासांत न झाल्यास, त्याला पासपोर्ट अडवून ठेवला जाईल व व्हिसाची सुविधा मिळणार नाही. नोंद झालेल्या अशा सर्व विवाहांची माहिती केंद्र सरकारकडे पाठवणेही रजिस्ट्रारना बंधनकारक असेल.