Corona Vaccination:मुलांच्या लसीकरणासाठी 'या' तारखेपासून सुरू होणार रजिस्ट्रेशन; याशिवाय मिळणार नाही लस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 02:34 PM2021-12-27T14:34:27+5:302021-12-27T14:39:29+5:30
Corona Virus Vaccination Registration: मुलांना भारत बायोटेकची कोवॅक्सिन किंवा झायडस कॅडिलाची ZyCoV-D लस दिली जाऊ शकते.
नवी दिल्ली: 3 जानेवारी 2022 पासून देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळाच्या दिवशी याबाबत घोषणा केली होती. यासाठी आता 1 जानेवारीपासून CoWIN अॅपवर नोंदणी सुरू होणार आहे. यासाठी मुले त्यांचे कोणतेही एक ओळखपत्र वापरुन रजिस्ट्रेशन करू शकतील. एएनआय या वृत्तसंस्थेने CoWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ. आरएस शर्मा यांच्या हवाल्याने ही माहिती दिली.
पंतप्रधानांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हणजेच 25 डिसेंबरला घोषणा केली होती की, 3 जानेवारीपासून देशातील 15-18 वयोगटातील मुलांना कोरोना विरोधातील लस दिली जाईल. याशिवाय, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करला बूस्टर डोस आणि 60 वर्षांवरील आजारी व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस दिला जाईल.
Children in the age group of 15-18 years will be able to register on the CoWIN app from Jan 1. We've added an additional (10th) ID card for registration - the student ID card because some might not have Aadhaar or other identity cards: Dr RS Sharma, CoWIN platform Chief pic.twitter.com/gfc2joTPol
— ANI (@ANI) December 27, 2021
रजिस्ट्रेशची प्रोसेस
- सर्वा आधी Covin App वर जा. तुमचा मोबाईल क्रमांक टाका. ओटीपी येईल, तो टाकून लॉग इन करा.
- आता तुमचा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.
- तुम्ही निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर लिंग आणि जन्मतारीख निवडा.
- मेंबर अॅड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
- आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्या.
- लसीकरण केंद्रावर, तुम्हाला आयडी आणि कोड द्यावा लागेल, हा तुम्हाला नोंदणी केल्यावर मिळतो.
देशात सुमारे 10 कोटी मुले 15 ते 18 वयोगटातील
अधिकृत आकडेवारीनुसार, देशात 15-18 वयोगटातील सुमारे 10 कोटी मुले आहेत. या बालकांना लसीचा पहिला डोस लवकरात लवकर देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. लहान मुलांसाठी लसीची मागणी देशात खूप दिवसांपासून केली जात होती. सध्या जगभरातील 30 हून अधिक देशात मुलांना कोरोनाची लस देत आहेत. क्युबामध्ये 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लसीकरण केले जात आहे, तर दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि फिलीपिन्समध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लस दिली जात आहे.
कोणती लस मिळेल ?
पंतप्रधानांच्या घोषणेनंतर देशपातळीवर लहान मुलांच्या लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतातील मुलांना भारत बायोटेकचे कोवॅक्सिन किंवा झायडस कॅडिलाचे ZyCoV-D, यापैकी एक डोस दिला जाऊ शकतो. या दोन्ही लस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
या लसींना लवकरच मिळू शकते परवानगी
तिसरी संभाव्य लस सीरम इन्स्टिट्यूटची नोव्हावॅक्स आहे. याला राष्ट्रीय औषध नियंत्रकाने 7 ते 11 वयोगटातील मुलांसाठी चाचणी करण्यास मान्यता दिली आहे. तर, चौथी बायोलॉजिकल E's Corbevax आहे, ज्याला पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर चाचण्यांसाठी मान्यता देण्यात आली आहे. Novavax आणि Corbevax ला अद्याप लसीकरणासाठी मंजूरी मिळालेली नाही.