लष्करात नसल्याचा रोज पश्चात्ताप होतो - गौतम गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 11:03 AM2018-01-26T11:03:26+5:302018-01-26T11:05:21+5:30
आपण जर क्रिकेटर नसतो, तर नक्की लष्करात असतो...कारण ते माझं पहिलं प्रेम आहे असं गंभीरने सांगितलं आहे
नवी दिल्ली - क्रिकेटर गौतम गंभीरचं देशप्रेम आणि लष्कर जवानांबद्दलची आपुलकी सर्वांनाच माहित आहे. त्याचं हे प्रेम आणि आदर फक्त सोशल मीडियापुरतं मर्यादित नाहीये. गौतम गंभीर निमलष्करी दलाशी संबंधित प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्यासोबतच शहीद जवानांच्या कुटुंबियांना शक्यती मदत करण्याचा सर्वोपतरी प्रयत्न करत असतो. सध्या गौतम गंभीर शहीद जवानांच्या कुटुंबियांचा खर्च उचलत आहे. मला हे सर्व करायला आवडतं, असं गंभीर आवर्जून सांगतो. 'आपण जर क्रिकेटर नसतो, तर नक्की लष्करात असतो कारण ते माझं पहिलं प्रेम आहे', असंही गंभीरने सांगितलं आहे. जेव्हा कधी आपण जवानांबद्दल विचार करतो, तेव्हा मनात गर्व आणि अंगावर काटा उभा राहतो असं गंभीरने म्हटलं आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरु असलेली तयारी पाहण्यासाठी गुरुवारी गौतम गंभीर इंडिया गेटवर पोहोचला होता. यावेळी टाइम्स ऑफ इंडियासोबत केलेल्या बातचीतमध्ये गौतम गंभीरने लष्कराबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं. गंभीरने यावेळी सांगितलं की, 'लष्कर माझं पहिलं प्रेम आहे आणि जर मी क्रिकेटर नसतो तर नक्की लष्करात असतो'. पुढे बोलताना त्याने म्हटलं की, 'मला दर दिवशी आपण लष्कराचा भाग नसल्याचा पश्चात्ताप होतो'.
गौतम गंभीर सुकमा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबाना शक्य ती सर्व मदत करत आहे. यासंबंधी बोलताना त्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करत असल्याची माहिती दिली. 'आपण त्यांच्या कुटुंबाला पुर्ण करु शकत नाही, पण शिक्षणासाठी काही मदत तर निश्चित करु शकतो', असं गौतम गंभीरने सांगितलं आहे.
राष्ट्रगीताचा सन्मान
राष्ट्रगीताचा सन्मान झालाच पाहिजे असं गंभीरने सांगितलं आहे. जेव्हा कधी राष्ट्रगीत वाजतं तेव्हा आपण 52 सेकंद उभे राहतो असं गंभीरने सांगितलं आहे. राष्ट्रगीतावरुन सुरु असलेला वाद विनाकारण असल्याचं गंभीरने सांगितलं आहे. राष्ट्रगीतावरुन वाद होण्याची कोणतीही गरज नव्हती. जर तुम्ही राष्ट्रगीताचा सन्मान करु शकत नसाल तर मग तुम्ही कोणत्या गोष्टीची अपेक्षा करु शकता ? असा सवाल गंभीरने विचारला आहे. गंभीरने म्हटलं आहे की, जर असंच सुरु राहिलं तर येणा-या दिवसांमध्ये 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टवरही प्रश्न उपस्थित होतील.