संतापजनक! फ्रँकफर्ट विमानतळावर भारतीय महिलेला कपडे उतरवण्यास सांगितले
By admin | Published: April 2, 2017 11:29 AM2017-04-02T11:29:09+5:302017-04-02T11:40:42+5:30
जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर आपल्यासोबत वर्णद्वेशातून गैरवर्तन झाल्याचा आरोप भारतीय वंशाच्या महिलेने केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर आपल्यासोबत वर्णद्वेशातून गैरवर्तन झाल्याचा आरोप भारतीय वंशाच्या महिलेने केला आहे. आइसलँडमध्ये राहणाऱ्या या महिलेने फ्रँकफर्ट विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी आपणास कपडे काढण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली असून, जर्मनीतील भारतीय दूतावासाकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
श्रुती बसप्पा असे गैरवर्तन झालेल्या भारतीय महिलेचे नाव आहे. त्यांनी फेसबुकवरून या संदर्भातील माहिती दिली आहे. त्या लिहितात, मी माझ्या कुटुंबासह भारतातून फ्रँकफर्टमार्गे आइसलँडला जात असताना ही घटना घडली. मी फ्रँकफर्टला उतरल्यावर तेथील सुरक्षा रक्षक मला एका खोलीत घेऊन गेले. त्यांनी मला माझे कपडे वर करण्यास किंवा उतरवण्यास सांगितले, जेणेकरून कपड्यात लपवून काही नेले जात तर नाही ना याची शहानिशा करता येईल. दु:खद बाब म्हणजे माझ्या चार वर्षीय मुलीसमोरच हा प्रकार सुरू होता.
फूल बॉडी स्कॅन झाल्यानंतरही आपणास कपडे वर करण्यास सांगण्यात आले, असा आरोप श्रुती यांनी केला. मात्र श्रुती यांनी असे करण्यास नकार दिला. अखेर श्रुती यांचे पती तेथे पोहोचल्यावर त्यांना सोडण्यात आले. आपल्यासोबत याआधीही असा प्रकार घडल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, श्रुती यांनी य़ा प्रकरणी फ्रँकफर्ट विमानतळ प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवली आहे.