नियमित सेवांना स्पेशल दर्जा देऊन रेल्वेची वाढीव दराने वसुली; सुविधांमध्येही कपात
By देवेश फडके | Published: January 12, 2021 04:48 PM2021-01-12T16:48:18+5:302021-01-12T16:51:25+5:30
भारतीय रेल्वेकडून नियमित सेवा स्पेशल ट्रेन म्हणून चालवत आहे. यामुळे भारतीय रेल्वे प्रवाशांकडून त्याच सेवांकरिता जादा रक्कम घेत आहे, अशी बाब समोर आली आहे.
नवी दिल्ली :भारतीय रेल्वेकडून नियमित सेवा स्पेशल ट्रेन म्हणून चालवत आहे. यामुळे भारतीय रेल्वे प्रवाशांकडून त्याच सेवांकरिता जादा रक्कम घेत आहे, अशी बाब समोर आली आहे. नियमित सेवांना स्पेशल दर्जा दिल्याने रेल्वे प्रवाशांना अतिरिक्त भाडे द्यावे लागत असून, वाढीव दराचा भार प्रवाशांच्या खिशावर पडत आहे, असे सांगितले जात आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना मार्च २०२० मध्ये रेल्वेची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच कोरोनामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती. यानंतर जून २०२० मध्ये टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला प्रवाशांच्या सोयीसाठी २०० मार्गांवर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. मात्र, हळूहळू रेल्वे सेवा वाढवण्यात आल्या. विशेष म्हणजे यानंतर रेल्वेने नियमित सेवांना स्पेशल दर्जा देऊन चालवल्या असल्याचा दावा करण्यात येत आहे.
देशात सण-उत्सवांचे वातावरण सुरू झाल्यानंतर फेस्टिव्हल सेवांनाही रेल्वेकडून मंजुरी देण्यात आली. मात्र, या सेवांचे भाडेही अन्य सेवांच्या तुलनेत अधिक आकारल्याचे समोर आले आहे. यातील काही सेवांचा कालावधी वाढवला आला आहे, असे समजते.
एका रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक सेवांना स्पेशल दर्जा देण्यात आला आहे. स्पेशल सेवांचा तिकीट दर नेहमीच अधिक असतो. यामुळे रेल्वेला प्रतिवर्षी १९८००० कोटी रुपये मिळतात. यापैकी ३५ हजार कोटी रुपये प्रवासी आणि मालवाहतुकीतून मिळतात. मात्र, कोरोनामुळे रेल्वेची मिळकत कोट्यवधी रुपयांनी घसरली आणि यामुळेच स्पेशल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
याशिवाय काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा कोटा रद्द करण्यात आला आहे. तसेच मेमू, पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणेच युटीएस काऊंटर्स बंद करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर वेटिंग रुममध्ये थांबण्यासाठीही आता १० रुपये दर आकारण्याचा रेल्वे विचार करत असल्याचे समजते.