उद्योगांसाठी पुनर्वसन निधी
By admin | Published: July 19, 2014 02:18 AM2014-07-19T02:18:04+5:302014-07-19T02:18:04+5:30
मंदीच्या फटक्यात मागील तीन वर्षांत महाराष्ट्रात ५१ हजार ६५१ सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग आजारी पडले आहेत.
नवी दिल्ली : मंदीच्या फटक्यात मागील तीन वर्षांत महाराष्ट्रात ५१ हजार ६५१ सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग आजारी पडले आहेत. आजारी उद्योेगांची श्रेणी करून, रोजगार वाचावा म्हणून अशा उद्योगांना पुनर्वसन निधी देण्यात आला आहे. जागतिक मंदीचा परिणाम देशात जाणवत नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी देशात दोन लाख २२ हजार उद्योग आजारी असून, १६ हजार कोटींची थकबाकी त्यांच्याकडे आहे.
राज्यात गेल्या तीन वर्षांत ५१ हजार ६५१ आजारी असून ७, १६८ हजार कोटींची थकबाकी आहे. यातील १ हजार ६३४ उद्योगांना वाचविण्यासाठी १,०७६ कोटींचा पुनर्वसन निधी देण्यात आला आहे. संपलेल्या आर्थिक वर्षांचे तपशील अजून आले नाहीत. केंद्रीय सांख्यीकी विभाग,भारतीय रिझर्व बँकेच्या ताज्या अहवालाचा दाखला देऊन ही माहिती उद्योग मंत्रालयाच्यावतीने लोकसभेत देण्यात आली आहे. त्यानुसार २०११ ते २०१३ या वर्षांत देशभरात ९२ हजार, ८८ हजार व २ लाख२२ हजार २०४ आजारी उद्योग आहेत. बेरोजगार झालेल्या कामगारांची संख्या रिजर्व बँक ठेवत नसल्याने ती संख्या उपलब्ध होत नसल्याचे सरकारने सांगितले. (विशेष प्रतिनिधी)