अयोध्येत मंदिराच्या जागेमध्ये होणार मशिदीची पूनर्बांधणी
By admin | Published: September 1, 2016 11:26 AM2016-09-01T11:26:58+5:302016-09-01T15:06:01+5:30
२४ वर्षांपूर्वी अयोध्येत बाबरी मशिद पाडल्यानंतर संपूर्ण देशभरात दंगली उसळल्या होत्या. त्याच अयोध्येत आता एका मंदिराच्या जागेमध्ये मशिद उभी राहणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. १ - २४ वर्षांपूर्वी अयोध्येत बाबरी मशिद पाडल्यानंतर संपूर्ण देशभरात दंगली उसळल्या होत्या. त्याच अयोध्येत आता एका मंदिराच्या मालकीच्या जागेमध्ये मशिद उभी राहणार आहे. अयोध्येतील ३०० वर्ष जुनी आलमगिरी मशिद मोडकळीस आली असून, स्थानिक प्रशासनाने या मशिदीला धोकादायक म्हणून जाहीर केले आहे.
या मशिदीत प्रवेश करु नये अशी नोटीस चिकटवण्यात आली आहे. आलमगिरी मशिद ज्या जागेवर उभी आहे ती जागा हनुमानगडी मंदिराच्या ताब्यात आहे. हनुमानगडी मंदिर न्यासाने त्याच जागेवर मशिदीच्या पुनर्बांधणीला परवानगी देताना, बांधकामाचा खर्च उचलण्याचीही तयारी दाखवली आहे तसेच मुस्लिम बांधवांना त्यांच्या ताब्यातील जागेवर नमाज पठणाला परवानगी दिली आहे.
१७ व्या शतकात अयोध्येत मुगल सम्राट औरंगजेबाच्या परवांगीने आलमगिरी मशिद बांधण्यात आली होती. १७६५ च्या सुमारास नवाब शुजाउद्दाउलहने मशिदीची जागा मंदिर न्यासाला दान दिली. मशिदीत नमाज पठण कायम सुरु राहिल या अटीवर ती जागा देण्यात आली होती.
इतक्या वर्षात मशिदीमध्ये कोणतीही दुरुस्ती न झाल्याने ही मशिद मोडकळीस आल्याने इथे नमाजपठण बंद झाले होते. अयोध्या महापालिकेने ही इमारत धोकादायक जाहीर करुन इथे प्रवेश करण्यावर बंदी घातली. त्यानंतर स्थानिक मुस्लिमांनी मंदिराचे मुख्य पूजारी महंत ग्यान दास यांची भेट घेऊन मशिदीच्या दुरुस्तीची परवानगी मागितली. मंदिर व्यवस्थापनाने नुसतीच परवानगी दिली नाही तर, मशिदीच्या दुरुस्तीमध्ये खर्च उचलण्याचीही तयारी दाखवली.