स्कॉर्पियोतून रेकी, मोठा घातपात घडवण्याची प्लॅनिंग, अयोध्येत अटक केलेल्या ३ संशयितांकडून गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 09:24 PM2024-01-19T21:24:02+5:302024-01-19T21:24:29+5:30
Ayodhya: अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश एटीएसने तीन संशयितांनां अटक केली आहे. या संशयितांचा संबंध खलिस्तानी दहशतवादी संघटनेशी आहे. हे तिघेही राजस्थानमधील रहिवासी आहेत.
अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश एटीएसने तीन संशयितांनां अटक केली आहे. या संशयितांचा संबंध खलिस्तानी दहशतवादी संघटनेशी आहे. हे तिघेही राजस्थानमधील रहिवासी आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं शंकरलाल, अजित कुमार आणि प्रदीप कुमार अशी आहेत. तिघांनीही आपल्या गाडीवर श्रीरामांचा झेंडा लावून अयोध्येची रेकी केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी शंकरलाल याने चौकशीत ही कबुली दिली आहे.
शंकरलाल हा कॅनडामधील खलिस्तान समर्थक हरमिंदर ऊर्फ लांडा याच्या संपर्कात होता. हरमिंदर याने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतने अयोध्येची रेकी करण्यास सांगितले आहेत असे शंकरला सांगितले होते. तसेच अयोध्येचा नकाशा पाठवण्याचीही सूचना दिली होती. कॅनडामध्ये असलेल्या हरमिंदर उर्फ लांडा याच्या सांगण्यावरूनच हे तिघेही अयोध्येत पोहोचले होते.
मिळत असलेल्या माहितीनुसार शंकरलाल राजस्थानमधील कुख्यात गँगस्टर आहे. तसेच त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो कॅनडामध्ये असलेल्या गँगस्टरच्या संपर्कात होता, तो खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंधित आहे. पोलीस आणि सुरक्षा यांत्रणांना चकवा देण्यासाठी आरोपी श्रीरामांचा ध्वज लावून अयोध्येत पोहोचले होते.
या आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर काही वेळातच सिख फॉर जस्टीसचा प्रमुख गुरपतवंतसिंह पन्नू याने एक ऑडिओ प्रसिद्ध करून या आरोपींना पाठिंबा दिला होता. आता उत्तर प्रदेश एटीएसने सीख फॉर जस्टिसच्या कनेक्शनचा तपास करण्यासही सुरुवात केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंतच्या चौकशीमध्ये तिन्ही संशयित हे खलिस्तान समर्थक हरमिंदर सिंह उर्फ लांडा याच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. रेकी केल्यानंतर ते अयोध्येतच थांबणार होते. तसेच पुढील सूचना मिळाल्यानंतर घातपात घडवणार होते. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींनी वापरलेली स्कॉर्पियो जप्त केली आहे.