पंतप्रधानांच्या दौऱ्यांची माहिती देण्यास नकार
By admin | Published: July 16, 2017 01:49 AM2017-07-16T01:49:27+5:302017-07-16T01:49:27+5:30
विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पूर्वसुरी मनमोहनसिंग यांच्या विदेश दौऱ्यांची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) नकार दिला आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पूर्वसुरी मनमोहनसिंग यांच्या विदेश दौऱ्यांची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) नकार दिला आहे. माहिती अधिकारांतर्गत दाखल करण्यात आलेला यासंबंधीचा अर्ज मोघम स्वरूपाचा आहे, असे पीएमओने म्हटले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्त्या नूतन ठाकूर यांनी यासंबंधीची माहिती पीएमओकडे मागितली होती. १६ जून रोजी त्यांनी पीएमओला माहिती अधिकारात अर्ज सादर केला होता. ‘पीएमओने आपणास माहिती नाकारली आहे’, असे नूतन ठाकूर यांनी सांगितले. ठाकूर यांनी मोदी आणि मनमोहनसिंग यांच्या विदेश दौऱ्यांसाठी विविध प्रकारची व्यवस्था करताना नेमका किती खर्च झाला याचा तपशील मागितला होता. जानेवारी २0१0 पासून पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावरील खर्च देण्याची मागणी त्यांनी केली होती.
पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय माहिती अधिकारी आणि निम्न सचिव प्रवीण कुमार यांनी ठाकूर यांचा अर्ज फेटाळून लावण्यात येत असल्याचे गुरुवारी त्यांना कळविले. प्रवीण कुमार यांनी म्हटले की, ‘अर्जात मागण्यात आलेली माहिती मोघम स्वरूपाची आणि फारच मोठी आहे. त्यामुळे ती देता येऊ शकत नाही.’
ठाकूर यांनी अर्जात दोन्ही पंतप्रधानांच्या दौऱ्याशी संबंधित सर्व फायलींच्या प्रती मागितल्या होत्या. संबंधित टिपणे, पंतप्रधान कार्यालय आणि अन्य विविध सरकारी कार्यालये यांच्यात झालेला पत्रव्यवहार, तसेच हस्तांतरित झालेले दस्तावेज याच्या प्रतीही त्यांनी मागितल्या होत्या.
अपील करणार
ही माहिती नाकारतानाच प्रवीण कुमार यांनी ठाकूर यांना कळविले की, माहिती अधिकार कायदा २00५ च्या कलम १९ अन्वये आपल्या निर्णयाविरुद्ध पीएमओचे संचालक सय्यद अक्रम रिझवी यांच्यासमोर अपील करता येऊ शकेल.’ नूतन ठाकूर यांनी म्हटले की, ‘आपण या निर्णयाविरुद्ध नक्कीच अपिलात जाऊ. पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावर नेमका किती खर्च झाला, हे देशाला कळलेच पाहिजे. तो आपला हक्क आहे.