अधिकाऱ्याच्या दोषमुक्तीस नकार
By admin | Published: May 31, 2017 01:03 AM2017-05-31T01:03:34+5:302017-05-31T01:03:34+5:30
खळबळजनक ठरलेल्या बिल्कीस बानो बलात्कार खटल्यात भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी आर. एस. भगोरा हे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : खळबळजनक ठरलेल्या बिल्कीस बानो बलात्कार खटल्यात भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी आर. एस. भगोरा हे दोषी ठरले असून, सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती देण्यास मंगळवारी नकार दिला. सुटीतील खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. के. सिकरी आणि दीपक गुप्ता म्हणाले की, दोषी ठरलेल्या अधिकाऱ्याने आधीच शिक्षा भोगलेली असल्यामुळे या अर्जावर तातडीने सुनावणी घेणे गरजेचे नाही. तथापि, खंडपीठाने या अर्जावर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी ठेवली
आहे.
भगोरा सध्या गुजरातमध्ये सेवेत कार्यरत असून, सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडल्यावर नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने इतर चार जणांसह भगोरा यांना दोषी ठरवले होते.
भगोरा आणि इतर चार जणांना सत्र न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने चार मे रोजी हा निर्णय फिरवला व बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार खटल्यात ११ जणांना दोषी ठरवले. (यातील एक आरोपी मरण पावला आहे). या खटल्यात उच्च न्यायालयाने दोन डॉक्टर्ससह पाच पोलिसांना दोषी ठरवले आहे.
केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) दोषींतील तीन जणांना कठोर शिक्षेची मागणी उच्च न्यायालयात अपील दाखल करून केली होती. या गुन्ह्यामध्ये हे तीन जण मुख्य अपराधी असल्याचे सीबीआयने म्हटले होते.
काय आहे प्रकरण?
२००२ च्या बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार व तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केल्याच्या खटल्यात विशेष न्यायालयाने २१ जानेवारी २००८ रोजी ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती व पोलीस कर्मचारी व डॉक्टरांसह सात जणांची निर्दोष मुक्तता केली होती.
गुजरातेत गोध्रा दंगलीनंतर बलात्कार व हत्या घडली होती. विशेष न्यायालयाच्या निर्णयाला दोषींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊन सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती.