दिल्ली-केंद्र यांच्यातील संबंध भारत-पाकसारखे
By admin | Published: July 18, 2016 06:07 AM2016-07-18T06:07:59+5:302016-07-18T06:07:59+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्ली आणि केंद्र्रातील संबंध या सरकारने भारत-पाकिस्तान संबंधासारखे करुन टाकले आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. जर अडथळे आणले गेले नसते तर यापेक्षा चार पट प्रगती आमच्या सरकारने केली असता असेही ते म्हणाले.
‘टॉक टू एके’ या जनतेसोबतच्या पहिल्या कार्यक्रमात केजरीवाल यांनी २१ संसदीय सचिवांची नियुक्ती, सीबीआयकडून वरिष्ठ सचिवांची अटक आदी वादग्रस्त मुद्यांवर उत्तरे दिली. मोदी यांना लक्ष्य करताना ते म्हणाले की, मोदी यांच्या दृष्टीने फक्त आपणच देशातील एकमेव भ्रष्ट मुख्यमंत्री आहोत. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात केजरीवाल यांनी आरोप केला की, केंद्राकडून आप सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या कार्यक्रमात नागरिकांनी थेट केजरीवाल यांना प्रश्न विचारले. अमीत शहा हे सीबीआयचा वापर करत आहेत असा आरोपही केजरीवाल यांनी केला. प्रत्येकाचे दिवस येत असतात सद्या जे काही चालू आहे ते फार काळ चालणार नाही, असेही ते म्हणाले.
>गुजरातमध्येही लढणार
पुढील वर्षी गुजरात विधानसभा निवडणुका लढविण्याचे संकेत त्यांनी दिले. त्या राज्यातील लोक भाजपचे सरकार हटवू इच्छितात असेही ते म्हणाले.
जाहिरातींवर दिल्ली सरकारने जी रक्कम खर्च केली त्याचे त्यांनी समर्थन केले. गत वर्षात ५२६ कोटी नव्हे, तर ७५ कोटी रुपये जाहिरातींवर खर्च झाला.