चुकून पाकिस्तानात गेलेल्या गीताने ओळखले नातेवाईक, लवकरच होणार घरवापसी
By Admin | Published: October 15, 2015 01:38 PM2015-10-15T13:38:56+5:302015-10-15T13:38:56+5:30
चुकून सीमारेषा ओलांडत पाकिस्तानात गेलेल्या गीता या मूकबधिर मुलीच्या भारतातील पालकांचा शोध लागला असून लवकरच तिला तिच्या घरी आणण्यात येईल
>ऑनलाइन लोकमत
कराची, दि. १५ - चुकून सीमारेषा ओलांडत पाकिस्तानात गेलेल्या गीता या मूकबधिर मुलीच्या भारतातील पालकांचा शोध लागला असून लवकरच तिला तिच्या घरी आणण्यात येईल अशी ग्वाही केंद्र सरकारच्या अधिका-यांनी दिली आहे. बारा वर्षांपूर्वी गीता अनवधानाने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली होती, आणि तिच्या सुदैवाने कराचीतील ऐधी फाउंडेशन ही सामाजिक संस्था तिची देखभाल करत आहे. गीता हिंदू असल्यामुळे इधी फाउंडेशनने तिच्या कोलीत सगळ्या देवदेवतांचे फोटो उपलब्ध करून देत पाकिस्तानसारख्या देशातही धार्मिक सहिष्णूता बाळगणारे लोक असल्याचा प्रत्यय आणून दिला. तिच्या परतीसाठी आवश्यक असलेल्या कादगपत्रांची पूर्तता झाल्यावर तिचा भारतात येण्याचा मार्गसुकर होईल असे सरकारी अधिका-यांनी सांगितले आहे.
गीताचे कुटुंब बिहारमधले असून त्यांचा फोटो पाकिस्तानातील भारताच्या उच्चायुक्तांच्या मार्फत तिला दाखवण्यात आला असता, तिने आपल्या कुटुंबियांना ओळखले असल्याचे सांगण्यात येत आहे.
सलमान खानच्या बजरंगी भाईजानच्या तुफानी यशानंतर गीताची स्टोरी चांगलीच चर्चेत आली आणि पडद्यावरची कथा वास्तवात उतरेल का अशी उत्सुकता दोन्ही देशांतील करोडो नागरीकांना लागली. अखेर, भारत सरकारने गीताच्या घरवापसीसाठी पुढाकार घेतला आणि तिच्या कुटुंबाचा शोध लागला असल्याने बजरंगी भाईजानप्रमाणेच या कथेचा शेवटही गोड होईल अशी शक्यता दिसत आहे.
सध्या गीता ही २० वर्षांची असून २००३मध्ये ती पाकिस्तानला गेली.