अटकेतील शेतकऱ्यांना सोडा, नंतरच सरकारशी चर्चा करू! राकेश टिकैत यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 07:22 AM2021-02-04T07:22:52+5:302021-02-04T07:25:00+5:30
Farmer Protest : आम्ही केवळ तिन्ही कृषी कायदे परत घ्या म्हणतोय, सिंहासन मागितले तर काय होईल? असा प्रश्न उपस्थित करीत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारचा तणाव वाढविला आहे.
- विकास झाडे
नवी दिल्ली - आम्ही केवळ तिन्ही कृषी कायदे परत घ्या म्हणतोय, सिंहासन मागितले तर काय होईल? असा प्रश्न उपस्थित करीत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारचा तणाव वाढविला आहे. दिल्लीच्या सीमेवर मागण्यांसाठी अडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज ७० दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही.
गेल्या दोन महिन्यात मंत्रीगट आणि शेतकरी नेत्यांमध्ये १२ बैठका झाल्यात. शेतकरी ऐकत नाही म्हणून वैतागून कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी यापुढे बैठका नाहीत, असे संकेत दिले होते. त्यानंतर आंदोलन उधळण्याचा प्रयत्न झाला. २६ जानेवारीला हिंसाचार झाला.
दुबळे आंदोलन पुन्हा जोर धरायला लागले त्यामुळे सरकारने रस्त्यांवर खिळे, काटेरी तारा खोवून शेतकऱ्यांचा रस्ताच बंद केला आहे. आता आंदोलनात पुन्हा गर्दी वाढली. सरकारला वाटते शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी व्हाव्यात, परंतु शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले जोपर्यंत अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडण्यात येत नाही तोपर्यंत आमची सरकारसोबत चर्चा नाही.
शरद पवारांची, राऊतांची भेट!
दिल्लीत आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आज शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. हिंसाचारास जवाबदार असलेला दीप सिद्धू याला अटक करावी, दिल्ली पोलिसांकडून रस्त्यावर ठोकण्यात आलेले खिळे, उभारण्यात आलेले सुरक्षाकड्याचा मुद्दा संसदेत उपस्थित करावा यासाठी पवारांना विनंती करण्यात आली. शिष्टमंडळात संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे, लक्ष्मण वांगे, अरुण कान्होरे तसेच केशव बोडके यांचा समावेश होता.
२२० शेतकरी बेपत्ता!
२६ जानेवारीच्या हिंसाचारानंतर जवळपास २२० आंदोलनकर्ते
बेपत्ता आहेत. यातील केवळ १३५ आंदोलकांची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. परंतु, उर्वरित आंदोलकांची माहिती पोलिसांकडून दिली जात नाही. या आंदोलकांना तिहाड कारागृहात डांबले असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.
अद्याप सिंहासन मागितले नाही!
गाजीपूर, सिंघू आणि टिकरी सीमेवर दररोज शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यांना रोखण्यासाठी सरकारने अनेक प्रकारे प्रयत्न केले. तरीही गाझीपूर येथे आंदोलकांची गर्दी वाढत आहे. आज रोहतक व जींद इथे राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची महापंचायत झाली.
त्यात शेतकऱ्यांना सोडेपर्यंत सरकारशी चर्चा करायची नाही असा निर्णय घेण्यात आला. टिकैत म्हणाले, आम्ही केंद्राला केवळ कृषी कायदे परत घ्या व एमएसपी कायदा करा असे सांगत आहोत.
त्यात तमाम शेतकऱ्यांचे हित आहे. तरीही सरकार आमच्याशी इतकी क्रूरपणे वागते. जर आम्ही सिंहासनच परत मागीतले तर सरकारची अवस्था कशी होईल.
दीप सिद्धूंना पकडण्यासाठी
लाखांचे बक्षीस
टि्वटरवर कारवाई
करण्याचा केंद्राचा इशारा
गदारोळ माजविणारे
आपचे तीन खासदार एक दिवसासाठी निलंबित
रॅलीत हिंसाचार : चौकशीची याचिका दाखल करून घेण्यास कोर्टाचा नकार