पाकच्या ताब्यातून काश्मीर मुक्त करू !
By admin | Published: August 14, 2016 05:55 AM2016-08-14T05:55:07+5:302016-08-14T05:55:07+5:30
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले एकतृतीयांश काश्मीरही भारताचेच आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितल्याच्या लगेच दुसऱ्याच दिवशी मूळचे
घघवाल (पंजाब) : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले एकतृतीयांश काश्मीरही भारताचेच आहे, असे पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी ठणकावून सांगितल्याच्या लगेच दुसऱ्याच दिवशी मूळचे काश्मीरचे असलेले त्यांच्या कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी पाकिस्तानने गिळलेले कामीर मुक्त करण्यासाठी मोदी सरकार आवश्यक ते सर्व काही करेल, अशी ग्वाही शनिवारी दिली. जितेंद्र सिंग यांनी पाकिस्तान सीमेजवळील या गावापासून ‘तिरंगा यात्रा’ सुरू केली आणि पाकिस्तानने बेकायदा बळकावलेले काश्मीर मुक्त करण्यासाठी रीतसर चळवळ सुरू करण्याचा संदेश दिला.
येथून कथुआ येथे ‘तिरंगा यात्रा’ रवाना करताना जितेंद्र सिंग म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यातील एक लढाई अद्यापही बाकी आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त करून त्यांचे भारताशी पुनर्मिलन घडविणे यासाठी ही लढाई असेल. (वृत्तसंस्था)
यात्रेचे ठिकाण महत्त्वाचे
या यात्रेसाठी निवडलेले घघवाल हे ठिकाण त्याचे भौगोेलिक स्थान व तेथून दिला जाणारा संदेश या दोन्ही दृष्टींनी महत्त्वाचे आहे. हे गाव सांबा आणि कथुआ या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. गेल्या दोन वर्षांत या दोन्ही जिल्ह्यांत पाकिस्तानमधून आलेल्या अतिरेक्यांकडून दहशतवादी हल्ले झालेले आहेत.
पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादसह कोटली व तेथील इतर भागांत भारताचा तिरंगा फडकेल तेव्हाच ‘तिरंगा यात्रे’ची खरी सांगता होईल, असे सांगून ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी औपचारिक व निरंतर चळवळ उभी करण्याचा संदेश येथून निघत असलेल्या यात्रेतून जाण्याची गरज आहे.
१३ आॅगस्टपासून ‘तिरंगा यात्रा’
स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्यांचे स्मरण करण्यासाठी व देशातील नागरिकांना राष्ट्रभक्ती आणि देशसेवेसाठी समर्पित करण्यासाठी १३ आॅगस्टपासून देशभर अशा ‘तिरंगा यात्रा’ काढण्याचा संदेश मोदींनी दिला होता. त्यानुसार ही यात्रा काढण्यात आली.
पाकचे ‘नापाक’ कृत्य सर्व जगाला माहीत आहे
पाकव्याप्त काश्मीरही लवकरच स्वतंत्र होईल. मोदी सरकार त्यासाठी काहीही करायचे शिल्लक ठेवणार नाही. पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट, बलुचिस्तानच्या लोकांना पाकपासून स्वातंत्र्य हवे आहे. पण पाकिस्तान त्यांचे स्वातंत्र्य आंदोलन चिरडून टाकत आहे. त्यासाठी पाकिस्तान स्वत:च्याच लोकांवर बॉम्बहल्ले करते व बुद्धिजीवींचे खून पाडते हे सर्व जगाला माहीत आहे, असेही जितेंद्र सिंग यांनी सांगितले.
गिलगिट-बाल्टिस्तान पाकने सोडून द्यावे
पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान गिळंकृत केले आहे. या भूभागातून पाकिस्तान हटल्यास काश्मीर प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अमेरिकेतील एका संस्थेने म्हटले आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध रोष वाढू लागला आहे. हा भूप्रदेश व्यापक काश्मीरचा भाग समजला जातो. सध्या तो पाकच्या ताब्यात आहे.