कुलभूषण जाधव यांची तात्काळ मुक्तता करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 04:31 AM2019-07-19T04:31:26+5:302019-07-19T04:31:37+5:30

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची तात्काळ मुक्तता करावी, अशी मागणी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानकडे केली.

Release of Kulbhushan Jadhav immediately, India's demand for Pakistan | कुलभूषण जाधव यांची तात्काळ मुक्तता करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

कुलभूषण जाधव यांची तात्काळ मुक्तता करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

Next

नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची तात्काळ मुक्तता करावी, अशी मागणी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानकडे केली आहे. त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सर्व पक्षांच्या खासदारांनी एकमुखी पाठिंबा दिला.
जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा पाकिस्तानने फेरविचार करावा असा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत निवेदन केले. यासंदर्भात ते म्हणाले की, कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क साधण्याच्या हक्कापासून पाकिस्तानने भारताला वंचित ठेवले. भारतीय राजदूतावासातील कर्मचाऱ्यांना जाधव यांची तुरुंगात भेट घेण्याकरिता व कायदेशीर मदत पुरवण्यासाठी पाकिस्तानने परवानगी द्यायला हवी होती. कुलभूषण जाधव यांच्यावर खोटे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांच्याकडून बळजोरीने जबाब घेण्यात आला असला तरी त्यामुळे सत्य परिस्थिती झाकली जाणार नाही. जाधव यांची मुक्तता करण्याच्या मागणीला लोकसभा व राज्यसभेतील सर्व पक्षांच्या खासदारांनी एकमुखी पाठिंबा दिला. जाधव हे निर्दोष आहेत अशी ठाम भूमिका भारताने मांडली आहे. जयशंकर म्हणाले की, कुलभूषण प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निर्णय १५ विरुद्ध एक या मताने मान्य करण्यात आला आहे. या निर्णयाला फक्त पाकिस्तानी न्यायाधीशानेच विरोध केला.
>पाकिस्तानी कायद्यानुसार कारवाई : इम्रान खान
कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानी कायद्यानुसारच पुढील कारवाई होईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना निर्दोष ठरविलेले नसून त्यांची मुक्तता करण्याचा निर्णयही दिलेला नाही याकडे लक्ष वेधत इम्रान खान यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, जाधव यांनी पाकिस्तानच्या विरोधात कारवाया केल्या आहेत. त्यांची मुक्तता करावी अशी भारताची मागणी मान्य करता येणार नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निकाल हा खरेतर पाकिस्तानचा विजय आहे.

Web Title: Release of Kulbhushan Jadhav immediately, India's demand for Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.